बेळगावमध्ये यंदा तापमानाचा पारा ४०.१ अंशांवर पोहोचल्याने उन्हाच्या तीव्र झळा बसत असून, याचा मोठा परिणाम मानवी जीवनासोबतच प्राणिसंग्रहालयातील वन्यजीवांवरही दिसून येत आहे.


बेळगाव शहर आणि परिसरात उष्णतेची लाट आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाढत्या उष्म्यामुळे ताप, डिहायड्रेशन यांसारख्या आरोग्य समस्या वाढल्या असून वृद्ध, मुले आणि कामगारांचे हाल होत आहेत. या कडाक्याच्या उन्हाचा फटका आता मूक प्राण्यांनाही बसू लागला आहे.


शहरानजीकच्या भूतरामणहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणिसंग्रहालयातील वन्यजीव वाढत्या तापमानामुळे सुस्तावलेले दिसत आहेत. नेहमी चपळ असणारे वाघ, सिंह आणि बिबट्यांसारखे हिंस्र प्राणी आता सावलीचा आधार घेत असून, त्यांच्या हालचाली मंदावल्या आहेत. अस्वल आणि तरसांसारखे प्राणीही उन्हामुळे व्याकुळ झाले आहेत.

हरणे, काळवीट यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरही उन्हाचा परिणाम झाला आहे. हे प्राणी आता कमी अन्न खात असून पाण्याचे प्रमाण वाढले आहे. बहुतांश वेळ हे प्राणी विश्रांती घेतानाच दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय प्रशासनाने प्राण्यांच्या संरक्षणासाठी तातडीने पावले उचलली आहेत. प्राण्यांच्या पिंजऱ्यांमध्ये दिवसभर स्प्रिंकलर सुरू ठेवण्यात आले आहेत. काही विशिष्ट प्राण्यांसाठी बर्फाच्या पाण्याचे स्नान (आईस बाथ) देऊन शरीराचे तापमान नियंत्रित राखण्याचा प्रयत्न केला जात आहे.
प्राण्यांच्या आहारातही बदल करण्यात आला असून त्यांना शहाळी, थंड फळे आणि इलेक्ट्रोलाईट्स दिले जात आहेत. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्राणिसंग्रहालयाचे पशुवैद्यक आणि कर्मचारी प्राण्यांच्या आरोग्यावर चोवीस तास लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक प्राण्याचे खानपान आणि हालचालींची नोंद घेतली जात असून, कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ उपचारांची तयारी ठेवण्यात आली आहे. मानवासोबतच वन्यजीवांचे रक्षण करणे हे सध्या प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे.


Recent Comments