खानापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीचा करारनामा बेकायदेशीरपणे बदलून फसवणूक केल्याप्रकरणी जय कर्नाटक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

खानापूर मधील तीर्थकुंडे येथील शेतकरी तातोबा विठ्ठल खामकर आणि तुकाराम विठ्ठल खामकर यांनी आपली ३ एकर जमीन राघवेंद्र रमेश नाईक याला केवळ दोन वर्षांच्या मुदतीने करारावर दिली होती. मात्र, राघवेंद्रने शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून ही मुदत २० वर्षे केली. इतकेच नव्हे तर करारापेक्षा जास्त जमिनीवर अतिक्रमण करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, यासंदर्भात आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
तीर्थकुंडे येथील तातोबा खामकर या गरीब शेतकऱ्याची जमीन दोन वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली असताना राघवेंद्र नाईक याने कागदपत्रात खोटी दुरुस्ती केली आहे. याबाबत जाब विचारला असता शेतकऱ्यांवर दडपशाही केली जात असून खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही ३ एकर जमिनीऐवजी ५ एकर जमीन बळकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, या पीडित शेतकरी कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी जय कर्नाटक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय रजपूत यांनी केली.
आम्ही शेतात पाऊल ठेवताच आम्हाला त्रास दिला जात असून शेतातील पिकांचेही नुकसान केले जात आहे. केवळ १५ लाख रुपयांच्या करारावर ही जमीन घेतली असून आता मालकी हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची संतप्त प्रतिक्रिया लक्ष्मी खामकर यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात खामकर कुटुंबातील सदस्यांसह जय कर्नाटक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्ये ने सहभागी झाले होते.


Recent Comments