ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उसाला योग्य आणि न्यायसंगत भाव मिळावा, या मागणीसाठी ‘कर्नाटक राज्य शेतकरी संघ’, ‘हसिरू सेना’ आणि वकील संघ यांच्या नेतृत्वाखाली चिकोडी शहरात सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही कायम राहिले आहे.
बसव चौकात सुरू असलेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी संकेश्वर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग आणि निपाणी-मुधोळ राज्य महामार्ग पूर्णपणे रोखून धरला. यामुळे शेकडो वाहनांची वाहतूक थांबली आणि चिकोडी शहर काही तासांसाठी पूर्णपणे स्तब्ध झाले.
शेतकऱ्यांनी सरकारकडे उसाला प्रति टन ₹३,५०० इतका दर निश्चित करण्याची मागणी केली. आंदोलकांनी “महाराष्ट्राच्या धर्तीवर दर दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल,” असा इशारा दिला आहे.
यावेळी आंदोलन थांबवण्यासाठी आलेल्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांच्या निर्धारापुढे त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले.
ऍडव्होकेट नागेश किवड, एन. बी. पाटील, राजू नंदिकुरळी, रमेश काळन्नवर, रमेश हित्तलमनी, एम. एस. ईटी, मंजुनाथ परगौडा, भीमा उदगट्टी, आनंद पाश्चापूरे, सुधाकर पाटील आणि कपली यांच्यासह अनेक शेतकरी नेते व वकील या आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या या तीव्र आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चिकोडी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Recent Comments