हुक्केरी तालुक्यातील कणगला ग्रामपंचायतमध्ये मोठा घोटाळा झाला असून विकासकामे थांबली आहेत, असा आरोप करत ग्रामस्थांनी हुक्केरी तालुका पंचायत समितीच्या आवारात आंदोलन केले.

या संदर्भात प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माहिती देताना गावातील नेते महांतेश खाडे म्हणाले की, कणगला ग्रामपंचायतमध्ये महाघोटाळा झाला आहे. ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामविकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध आज हुक्केरी तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. जर यावर योग्य कार्यवाही झाली नाही, तर बेळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे आणि वरिष्ठांकडे निवेदन देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायत सदस्य आकाश केरीमनी यांनी सांगितले की, आम्ही तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. येत्या काही दिवसांत कणगला ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल. तसेच, बेंगळुरू आणि बेळगाव येथील लोकायुक्त अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली जाईल. कणगला ग्रामपंचायतच्या १८ गावांमध्ये कोणतीही विकासकामे झालेली नाहीत, मात्र ती कागदोपत्री पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. यासंदर्भात राज्य सरकारचे लक्ष वेधून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर आंदोलनकर्त्यांनी हुक्केरी तालुका कार्यकारी अधिकारी टी. आर. मल्लाडद यांना निवेदन सादर केले.
ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब खाडे यांनी आरोप केला की, नरेगाअंतर्गत काम केलेल्या अनेक मजुरांची बिले अजूनही दिली गेलेली नाहीत. ग्रामपंचायतीकडे औद्योगिक क्षेत्रातून करापोटी मोठा निधी जमा होत असूनही विकास होत नाहीये. ‘कार्यालयात नसलेले अधिकारी बाहेर बसून काम करतात, त्यामुळे ग्रामस्थांना भेटायला अधिकारी उपलब्ध होत नाहीत,’ असेही त्यांनी नमूद केले.
नंतर, आंदोलनस्थळी उपस्थित झालेले कार्यकारी अधिकारी मल्लाडद यांनी निवेदन स्वीकारले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या वेळी कणगला गावातील आकाश केरीमनी, महांतेश खाडे, अण्णासाहेब खाडे, नेताजी मेलके, सोमनाथ नाईक, केदारी मुतनाळे, मल्लेश किवंड, दत्ता पाटील, सयाजी हवालदार, श्रीकांत पाटील, राऊल करडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments