बागलकोट जिल्ह्याला दसरा सणादरम्यान एका दुःखद घटनेने गालबोट लागले आहे. मुधोळ तालुक्यातील जमखंडी बी.के. गावाजवळ काल घटप्रभा नदीत धार्मिक विधिदरम्यान एका व्यक्तीचा नदीत बुडून मृत्यू झाला असून, अन्य दोन व्यक्तींना वेळीच वाचवण्यात यश आले आहे.

मुधोळ तालुक्यातील जमखंडी बी.के. गावाजवळ घटप्रभा नदीच्या पुलाजवळ काल सायंकाळी हा अपघात घडला. दसरा सणाच्या निमित्ताने गावातील बन्नम्मा देवीला नदीत स्नान घालण्यासाठी काही ग्रामस्थ नदीवर गेले होते. याचवेळी सचिन मादर (वय ३४) हा व्यक्ती देवतेसह नदीच्या पाण्यात उतरला असता, तो प्रवाहाच्या दिशेने ओढला गेला आणि बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या अन्य दोन व्यक्तींचाही जीव धोक्यात आला होता. मात्र, नदीकिनारी उपस्थित असलेल्या महिलांनी प्रसंगावधान राखून आपल्या अंगावरील साड्यांच्या साहाय्याने पाण्याच्या बाहेर काढले आणि दोघांना वाचवण्यात यश आले.

दुर्दैवाने, सचिन मादर याला वाचवण्यात यश आले नाही. त्याचा मृतदेह शोधण्यासाठी तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि शोधकार्य सुरू केले आहे. ही घटना समजताच नदीकाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली. सचिनच्या कुटुंबातील सदस्यांनी घटनास्थळी हंबरडा फोडला. दसऱ्याच्या आनंदावर या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद मुधोळ पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments