Belagavi

चौथा रेल्वे गेट बंद, तिसऱ्या गेटवर वाहतुकीची कोंडी!

Share

एकीकडे भुयारी मार्गिकेच्या कामामुळे बेळगावमधील चौथ्या रेल्वे गेटवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर दुसरीकडे पर्यायी मार्ग असलेल्या तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी वाढल्याने खराब रस्त्यांमुळे नागरिकांच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. चौथ्या रेल्वे गेटवर भुयारी मार्गिकेच्या कामामुळे वाहतूक प्रतिबंधित करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून तिसऱ्या रेल्वे गेटवरील उड्डाणपुलावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून, पावसाळ्यात वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

चौथा रेल्वे गेट बंद झाल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. अनगोळ, वडगाव, यळ्ळूर येथील नागरिकांना प्रवासासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहेत. पावसाळ्यापूर्वीच काम सुरू करायला हवे होते. सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी खूप वाढते. त्यामुळे काम लवकर पूर्ण करून लोकांचे हित साधावे, अशी मागणी नागरिकांनी केली. पाऊस पडला की या रस्त्याला खड्ड्यांचे स्वरूप येते. अनेकजण पडून जखमी होत आहेत. कोणतेही लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाहीत. एकदा दुरुस्ती केली होती, पण त्यानंतर कोणीही लक्ष दिले नाही. शालेय मुलांनाही त्रास सहन करावा लागतोय. केवळ तात्पुरते पॅचवर्क केले जाते, तेही पावसात उखडून जाते, असे नागरिकांनी सांगितले.

चौथा रेल्वे गेट रस्ता बंद झाल्याने, पर्यायी रस्ता खराब झाला आहे. केवळ तात्पुरती दुरुस्ती केली जाते. पण पावसामुळे खूप त्रास होतोय. पाणी साचून चिखलमय वातावरण निर्माण होते. ऑटो चालकांना तर प्रवाशांना घेऊन जाणे कठीण होत आहे.

तिसरा रेल्वे उड्डाणपूल बांधून सुमारे तीन वर्षे झाली आहेत. तरीही प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात, ज्यामुळे वाहनचालकांना प्रवासात अडचणी येतात. गोवा मार्गे येणारे लोकही नाराजी व्यक्त करत आहेत. अशा परिस्थितीत चौथा गेट बंद झाल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे. घटनास्थळी वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास वाहतुकीसाठी सोयीस्कर होईल, अशी मागणी नागरिकांची आहे.

चौथा रेल्वे गेट बंद असल्याने तिसऱ्या गेटवर वाहतूक कोंडी वाढत आहे. त्यामुळे ही समस्या तात्काळ सोडवावी, अशी लोकांची मागणी आहे.

Tags: