युवक-युवतींनी टीव्ही, मोबाईल, रिल्सच्या मागे न लागता व्यासपीठावरील जाहीर कार्यक्रमात भाग घेऊन सभाधारिष्ठय वाढवावे असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मल्लेश चौगुले यांनी केले.

बेळगावात जिल्हा क्रीडा संकुलात शनिवारी जिल्हास्तरीय युवजनोत्सवासाठी निवड चाचणी आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मानवरांचा सत्कार समारंभ पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

पुढे बोलताना मल्लेश चौगुले म्हणाले की, गेली ४८ वर्षे मी क्रीडा आणि युवजनसेवा खाते, नेहरू युवा केंद्राशी जोडलेला आहे. आमच्या काळी युवजनोत्सवासारख्या उपक्रमांत वशिला लावून, विनंत्या करून भाग घ्यावा लागत असे. युवजनोत्सवात भाग घेण्यासाठी अहमहमिका लागायची. इतके महत्व या उपक्रमाला होते. सध्या युवजनोत्सवाला पूर्वीचे वैभव मिळवून देण्यासाठी आपण सर्वै प्रयत्न करू, खेडोपाडी जाऊन जागृती निर्माण करून युवापिढीचा सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
क्रीडा आणि युवजनसेवा खात्याचे उपसंचालक बी. श्रीनिवास म्हणाले की, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार युवजनोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केवळ लोकगीतांवर आधारित युवजनोत्सव आयोजित करण्याची सूचना आहे. त्यामुळे चाचणीला कमी प्रतिसाद लाभला असावा. पण सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
युवक-युवतींनी स्थानिक कला, संस्कृतीत पारंगत होऊन युवजनोत्सवात आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बेळगाव जिल्ह्याच्या विविध भागातून शाळा-महाविद्यालयांचे विध्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, प्राध्यापक, क्रीडा व युवजनसेवा खात्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments