Chikkodi

मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण, उद्यापासून सभा : खा. अण्णासाहेब जोल्ले

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला 9 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप केंद्र सरकारच्या कर्तृत्वावर माहिती देण्यासाठी उद्यापासून चिक्कोडी लोकसभा परिसरात भाजपच्या मतदारसंघव्यापी सभा घेण्यात येणार असल्याची माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.

चिक्कोडीत खासदार कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार जोल्ले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वीपणे 9 वर्षे पूर्ण केली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकासकामांची जनतेला माहिती देण्यासाठी सभांचे आयोजन केले आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात उद्या सकाळी 9 वाजता चिक्कोडी मतदार संघातील येडूर गावातून याचा प्रारंभ होईल. तर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत केरूर आणि 3 ते 5 हिरेकुडी आणि 5 ते 7 या वेळेत नेजमध्ये सभा घेऊन विकासकामांची माहिती देण्यात येणार आहे.

मी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी सरकारमधील खासदार आहे ही अभिमानाची बाब आहे. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. केंद्र सरकारच्या कामगिरीची जनतेला माहिती देण्यासाठी माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ तसेच भाजपचे पदाधिकारीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.प्रत्येक मतदारसंघातील आमदार व माजी आमदारांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी सांगितले.

यावेळी चिक्कोडी जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश नेर्ली, भाजप रयत राज्य मोर्चाचे उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवडे, चिक्कोडी नगरपालिकेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, भाजप जिल्हा सरचिटणीस सतीश अप्पाजीगोळ, रायबाग मंडळाचे अध्यक्ष बसवराज डोणवडे, मंडळ अध्यक्ष संजय पाटील आदी उपस्थित होते.

Tags: