बेळगावातील केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय! हॉस्पिटलच्या ईएनटी आणि एचएनएस विभागाने रायबाग आणि बेळगाव येथील दोन मुलांवर कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी शस्त्रक्रिया करून प्रगत वैद्यकीय उपचारात आणखी एक मैलाचा दगड रचला आहे.

होय, लहान मुलांमधील बहिरेपणा कायमचा दूर करण्यासाठी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते. श्रवणयंत्राचा लाभ न मिळालेल्या अशा बालकांसाठी ही शस्त्रक्रिया एकमेव आशास्थान आहे. केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र हे उत्तर कर्नाटकातील एकमेव खासगी रुग्णालय आहे, ज्याला कर्नाटक सरकारच्या सुरक्षा आरोग्य सुवर्ण ट्रस्ट अंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी पॅनेलमध्ये समाविष्ट केले आहे. अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे काम शक्य झाले आहे.

बेळगावच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी बेंगळुरूस्थित सर्जन डॉ. वासंती आनंद यांनी या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी केल्या. या टीममध्ये ईएनटी आणि एचएनएस विभागाचे प्रमुख डॉ. बी. पी. बेळदावार, ईएनटी आणि एचएनएस विभागाचे प्राध्यापक डॉ. ए. एस. हारुगोप्पा, डॉ. प्रीती हजारे यांचा समावेश होता. ऍनेस्थेशिया विभागाचे डॉ. केदारेश्वर यांनी शस्त्रक्रियेसाठी सहकार्य केले. ऑपरेशन यशस्वी झाले असून काही दिवसांत रूग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे केएलई हॉस्पिटलच्या कॉक्लियर इम्प्लांट कार्यक्रमाच्या समन्वयक डॉ. प्रीती हजारे यांनी सांगितले. केएलई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. एस. महांतशेट्टी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, वैद्यकीय संचालक डॉ. कर्नल एस. दयानंद, वैद्यकीय अधीक्षक व उपप्राचार्यांनी या टीमचे अभिनंदन व कौतुक केले.


Recent Comments