उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

मुलायम सिंह यांना 22 ऑगस्ट रोजी गंभीर आजारामुळे मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 ऑक्टोबरच्या रात्री त्यांना मूत्राशयाच्या संसर्गाने गंभीर आजार झाला. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांचे पथक मुलायम सिंह यादव यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करत होते. गेल्या काही महिन्यांपासून आजारी असलेले माजी मुख्यमंत्री मुलायम यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 2020 मध्ये त्यांना कोविडची लागण झाली आणि त्यातून ते बरे झाले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत असल्याचे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले.

मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.


Recent Comments