अलीकडे कमी वेळेत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. बेळगावमध्ये अशा अनेक कंपन्यांनी ग्राहकांना डबघाईला घालून आर्थिक फसवणूक केली असून आता टिळकवाडी येथील वाइका रिटेल अँड टेक्नॉलॉजीस या खाजगी कंपनीविरोधात अशीच एक तक्रार पुढे आली असून याप्रकरणी सीआयडी तपास सुरु आहे.

वाइका रिटेल अँड टेक्नॉलॉजीस प्रा. लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत. कमी वेळेत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप या कंपनीविरोधात गुंतवणूकदारांनी केला आहे. याप्रकरणी सीआयडी पथक चौकशी आणि तपास करत असून आज चिकोडी येथील सीपीआय कार्यालयात तपास अधिकारी, पोलीस उपअधीक्षक सिटीआर विभाग आणि सीआयडी बेंगळूर यांच्यावतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बेंगळूरचे सीआयडी अधिकारी एन श्रीहर्ष यांनी या कंपनीतील गुंतवणूकदारांना स्वेच्छेने तपास कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

बेळगाव जिल्हा, चिकोडी पोलीस स्थानक तक्रार क्रमांक २५७/२०२१, कलम ४२०, ५११ सह आयपीसी ३४ आणि कलम २१(१), २१(२) बड्स कायदा २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारचा तपास बंगळुरूमध्ये सीआयडी विभागाअंतर्गत सुरु आहे. या प्रकरणातील आरोपी ए-१ सिद्धार्थ काडाप्पा जंबगी आणि त्याचे सहकारी बेळगावमधील टिळकवाडी येथील सोमवार पेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र समोर असलेल्या क्लासिक मनोरम इमारतीतील ऑफिसमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिकोडी आणि बेळगाव शहरातील नागरिकांना विश्वासात घेऊन दामदुप्पट रकमेचे आमिष दाखवून गुंतवणुकीच्या स्वरूपात बेकायदेशीर पद्धतीने पैसे आकारात असल्याची माहिती पुढे आली आहे. या कंपनीत ग्राहकांनी गुंतविलेल्या पैशाचा दुरुपयोग करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडी पथक चिकोडी आणि बेळगाव जिल्ह्यात आले असून वाइका रिटेल आणि टेक्नॉलॉजीस कंपनीमध्ये ज्या ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनी स्वेच्छेने तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यासाठी एन श्रीहर्ष, पोलीस उपअधीक्षक, सिटीआर विभाग, सीआयडी बेंगळुरू, ९५९११२८२८८, ८१०५७६८६७१ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेला सीपीआय आर आर पाटील, करेयाप्पा बेळ्ळी आदी उपस्थित होते.


Recent Comments