आधुनिक जीवनशैली, वाढती लोकसंख्या आणि वाढत्या औद्योगिकीकरणामुळे तलाव नष्ट होत चालले आहेत. शहरातील तलावांचे रूपांतर मैदानात होत आहे. परिणामी याचा फटका जनतेला तसेच जनावरांनाही बसत आहे. यामुळे तलावांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा संचालक प्रदीप शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.

श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामविकास योजना खासबाग, तालुका तलाव विकास समिती बसवण कुडची यांच्या सहयोगाने धर्मस्थळ योजनेच्या वतीने रचण्यात आलेल्या तलाव पुनरुज्जीवन कार्यक्रमात ते बोलत होते. सदर कार्यक्रमांतर्गत ४०० कळसगिरी तलावांचे हस्तांतरण तसेच गंगा पूजन कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रदीप शेट्टी म्हणाले, पाणी वाचविण्यासाठी तलाव वाचविण्याचे कार्य केले पाहिजे. कळसगिरी तलाव योज़न ४८०४२३ रुपयांच्या अनुदानातून ३०५ तास काम करून, ५४४५ ट्रॅक्टर आणि ६४३ टिप्पर यांच्या मदतीने १०४ शेतकऱ्यांनी पिकाऊ जमिनीत माती टाकली आहे. हे काम प्रत्येक गावात करण्यात यावे, असे ते म्हणाले.

नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले कि, आमच्या शहरातील विहिरी व बोअरवेलमध्ये पाणी असल्याने भूगर्भातील पाणी वाढले असून, धर्मस्थळ च्या माध्यमातून जनतेने पाण्याअभावी कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. यापुढील काळातील कामकाजासाठी मनपाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तलाव समितीचे अध्यक्ष शीतल पाटील होते. या कार्यक्रमास निळकंठ शास्त्री, योजनाधिकारी मंजुनाथ एन आर, अभियंते निंगराज, बसवेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष महावीर पाटील, समिती सचिव बसवराज हन्नीकेरे आदी उपस्थित होते. जिल्हा अधीक्षक विनायक यांनी स्वागत केले. कृषी पर्यवेक्षक मंजुनाथ गौडा यांनी आभार मानले. यावेळी शेतकरी, तलाव समिती सदस्य, योजना संघाचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments