बेळगाव तालुक्यातील कडोली परिसरात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र सर्वत्र एकाच वेळेला कामे चालु असल्याने कामगारांची टंचाई भासत असून वीज पुरवठ्याअभावीही शेतकऱ्यांना समस्या येत आहे.

होय, कडोली परिसरासह बेळगाव तालुक्यात सध्या भात लावणी हंगाम युद्धपातळीवर सुरु आहे. गेले पंधरा दिवस पाऊसही सतत पडत असला तरी अजुन जमिनीमध्ये उंबळ सुटण्यासारखे जमिनीत पाणी झालेले नाही. बटाटे, मका, रताळी व शेंगासह इतर पिकांना फटका बसला आहे. तथापि भात लावणीसाठी मात्र अत्यंत पोषक वातावरण आहे. कडोली भागात इंद्रायणी भाताचे उत्पादन अधिक घेण्यात येते. ८०% टक्के भात इंद्रायणी लावणी तर फक्त २०% इतर जातीच्या भाताची पेरणी केली जाते. नट्टी लावणीसाठी शेतात चिखल करण्यासाठी वीज पुरवठ्याची फार आवश्यकता भासते. मात्र जोरदार पाऊस, वारा व तांत्रिक दोषाचे कारण सांगुन हेस्कॉमकडून वारंवार वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकरी हेस्काम अधिकाऱ्यांच्या नावे बोटे मोडत आहेत. आवश्यक दुरुस्ती करुन सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंत विद्युत पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.


यासंदर्भात बोलताना बेळगाव तालुका रयत संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब देसाई म्हणाले, नरेगामुळे शेतात काम करण्यास गडी मिळत नाहीत. त्यांची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे छोट्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेती करणे परवडेना झाले आहे. तशातच हेस्कॉमकडून दिवस वीज पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. सरकारने नरेगा योजना सुरु ठेवावी मात्र त्याला सर्वसमावेशक स्वरूप द्यावे अशी मागणी त्यांनी केली. कडोलीतील गौरी नाला फुटुन शेकडो एकर जमीन आणि पिके नाश होऊन शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. गेली चार वर्ष निवेदने देत आहोत. तरी संबंधीत खात्याने दुर्लक्ष केले आहे. किमान आता तरी जातीने लक्ष देऊन त्वरीत हि समस्याही सोडवावी अन्यता उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
डिझेलचे व आवश्यक वस्तूंचे दर वाढल्याने यांत्रिक शेती करणेही आवाक्याबाहेरचे होत असल्याचे शेतकरी अमित पाटील यांनी सांगितले.
डोंगराळ भागातील काही टोळ्या अंगावर पद्धतीने घेऊन भात लावण्यासाठी कार्यरत आहेत. एका कामगाराला २०० ते २४० पर्यंत तर पुरुषांना ३०० मजुरी द्यावी लागते. असे एकराला पंधरा कामगार लागतात. तर कंत्राट घेणारे एकराला ५००० ते ५५०० असा दर घेता. ट्रेलर मारून चिखल करणे, १०-२६, पोटॅश, युरिया आदी खते व तणावरील औषध वगैरे मिळून एकरी एकुण सर्व खर्च मिळून १५ ते १६ हजारापर्यंत खर्च येतो. बी-बियाणे, यंत्रोपकरणे, खते, तणनाशक व रोग नाशक औषधे व कामगार या सर्वांचा भरमसाठ वाढलेला खर्च, महागाई आणि भाताला मिळणारा भाव यामध्ये मोठी तफावत आहे. या सगळ्यातून सावरून भात पिकवणे तसे कठीणच बनले आहे. सरकार व संबंधीत कृषी खात्याने इतर आवशयक घटकांचे दर कमी करुन भातासह सर्व पिकांना हमीभाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments