Belagavi

बेळगावात डोळ्यांचे पारणे फेडणारी शिवजयंती मिरवणूक

Share

 ढोलताशांचा कडकडाट, वीररसयुक्त प्रेरणादायी पोवाडे आणि शिवरायांच्या जीवनावर आधारित सजीव देखाव्यांचे सादरीकरण असा पारंपरिक साज ल्यालेली, तरुणाईच्या उत्साहाने सळसळलेली, डोळ्यांचे पारणे फेडणारी भव्य शिवजयंती मिरवणूक बेळगावात बुधवारी रात्री काढण्यात आली.

होय, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची  जयंती बेळगावात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बुधवारी सायंकाळी शिवरायांच्या जीवनावर आधारित सजीव देखाव्यांचा समावेश असलेली भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. ‘जय भवानी-जयशिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा अंगावर रोमांच उठवणारा अखंड जयघोष, ढोल-ताशा पथकांचे वादन, भगवे झेंडे हाती घेऊन तालबद्ध नृत्य करणाऱ्या युवतींची पथके, पारंपरिक लेझीम, लाठीमेळा पथके आणि त्यामागे शिवरायांच्या जीवनातील एकाहून एक हुबेहूब प्रसंग सजीव देखाव्यातून साकारणाऱ्या कलाकारांचे चित्ररथ अशा थाटात ही मिरवणूक काढण्यात आली. २ हजारहून अधिक कलाकारांनी यावेळी आपले कौशल्य प्रदर्शित केले.

गणपत गल्लीतून सायंकाळी ७ च्या सुमारास श्री शिवपालखीचे मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, सचिव मालोजीराव अष्टेकर, आ. अनिल बेनके, आ. अभय पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते पूजन करून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. सुरवातीला चित्ररथांचा सहभाग कमी होता. सायंकाळी उशिरानंतर उत्सव मंडळांचे चित्ररथ एकापाठोपाठ दाखल होऊ लागले. रात्र होईल तसा मिरवणुकीत रंग भरू लागला. भगवे झेंडे हाती घेऊन, लहान मुलांसह अबालवृद्धांनीही मग मिरवणूक पाहण्यास गर्दी सुरु केली. मंडळांच्या चित्ररथासमोर लेझीम, लाठीमार अशा मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविण्यात येत होती. त्याशिवाय विशिष्ट लय आणि तालावर ढोल-ताशा वादन, ध्वज नृत्य सादर करण्यात आले. नरवीर, वज्रनाद आदी ढोल पथके, रणरागिणी व अन्य युवती पथकांचे ध्वजनृत्य सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रात्री उशिरा कॅम्प भागातून सहभागी झालेल्या चित्ररथांसमोर लावलेल्या डीजेच्या तालावर तरुणाई अक्षरशः थिरकली.

https://youtu.be/H8xh5Oj73XU

गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी मंदिर, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड आदी मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून पहारा देत होते. ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे मिरवणूक मार्ग आणि संवेदनशील परिसरावर नजर ठेवण्यात आली होती. शहर पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी मिळून ३ हजारहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोविडमुळे गेली २ वर्षे शिवजयंती मिरवणुकीवर बंधने आली होती. पण यंदा कोविडचा कहर कमी झाल्याने सरकारने मिरवणुकीला मुक्त परवानगी दिली. त्यामुळे उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वहात होता.

धर्मवीर संभाजी चौकात इन न्यूज आपली मराठीच्या वतीने शिवजयंती मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्याचा अनेक नागरिकांनी घरबसल्या आनंद लुटला. पोलीस आयक्त बोरलिंगय्या, आ. अभय पाटील, आ. अनिल बेनके, माजी आ. संजय पाटील, एसीपी नारायण बरमणी, नगरसेवक व अन्य मान्यवरांनी इन न्यूजच्या थेट प्रक्षेपण स्थळाला भेट देऊन मिरवणुकीचा आनंद लुटला. यावेळी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी बेळगावकरांना शुभेच्छा देऊन, मिरवणूक शांततेत यशस्वीरीत्या प्रा पाडण्याचे आवाहन केले. बेळगावच नव्हे तर तालुका, जिल्हा, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, अशा महाराष्ट्रातील विविध भागातील लोकांनी तसेच गोव्याच्या नागरिकांनी मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. फ्लो

Tags: