Vijayapura

दलितांबाबत सिद्दरामय्यांइतकी काळजी कोणालाच नाही : एम. बी. पाटील

Share

दलितांबाबत सिद्दरामय्यांइतकी काळजी कोणालाच नाही. दलितांचा उपयोग करून कोणी राजकारण करू नये असे त्यांनी म्हटले होते. मात्र भाजप राजकीय स्वार्थासाठी त्यांच्या विधानाचा सोयीनुसार अर्थ काढत आहे असा घणाघाती आरोप माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी केला.

सिद्दरामय्यांविरोधात भाजपने चालविलेल्या आंदोलनाबाबत विजापुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया देताना माजी मंत्री एम. बी. पाटील म्हणाले, सिद्दरामय्या यांनी दलितांविरोधात कधीच वक्तव्य केलेले नाही. दलितांबाबत सिद्दरामय्यांइतकी काळजी कोणालाच नाही. देशात सर्वप्रथम त्यांनीच एससीपी, टीएसपी शेकडा २४% इतक्या ४ हजार कोटी रुपये अनुदानात त्यांनी घसघशीत २५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढ केली, कायदेशीररित्या त्यांनी ही ग्रॅन्ट मंजूर केली असे सांगितले. राज्याला दलित मुख्यमंत्री देण्याबाबत पक्ष काय तो निर्णय घेईल. आधी आमचे सरकार आले पाहिजे. किमान ११५ जागा जिंकल्यावर यावर विचार केला जाईल. सध्या आम्ही सत्तेत नाही. भाजप सत्तेत आहे. त्यांनी दलित मुख्यमंत्री करून दाखवावा. आमचे सरकार आल्यावर आम्ही विचार करू असे आव्हान त्यांनी भाजपला दिले.  सिंदगी मतदारसंघातील प्रबाव आम्हाला मान्य आहे. परंतु तेथे भाजपचे मंत्री ठाण मांडून बसले होते. त्यांनी पैशांच्या राशी ओतून विजय मिळवला आहे. तरीही आम्ही हात जोडून हा पराभव मान्य करतो. परंतु गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आम्ही ३ पट अधिक मते मिळवली आहेत. सुमारे ६० हजार मते मिळवली आहेत. २०२३च्या निवडणुकीत विजापूर जिल्ह्यातील सर्व ८ मतदार संघात काँग्रेस विजय मिळवेल असा विश्वास माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १४ नोव्हेंबरपासून विभागवार बैठक घेण्यात येणार आहेत. १४ रोजी सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या, राज्य काँग्रेस प्रभारी रणजितसिंग सुरजेवाला यांच्या नेतृत्वाखाली बैठक होणार आहे. त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित करून हायकमांडला शिफारस करण्यात येईल. मागे दोन्ही जागा आम्ही जिंकल्या होत्या. पक्ष आणि लोकप्रतिनिधींच्या निर्णयानुसार हायकमांडला शिफारस करण्यात येणार आहे असे माजी मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.

Tags: