Vijayapura

विधानसौधला कोणी टाळे ठोकलेले नाही : मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Share

विधानसौधला कोणी टाळे ठोकलेले नाही, सर्व कामे, प्रशासन सुरळीत सुरु आहे असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काँग्रेस नेते जमीर अहमद यांच्या आरोपाला सोमवारी दिले.  

विधानसौधला कुलूप लावून भाजपचे मंत्री पोटनिवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत असा आरोप काँग्रेस आ.  जमीर अहमद यांनी केला होता. सोमवारी विजापुरात पत्रकारांशी बोलताना त्याला प्रत्युत्तर देताना बोम्मई म्हणाले, आमच्या सगळ्या मंत्र्यांचे विधानसौधमध्ये जाणेयेणे सुरु आहे. कुठलेही काम थांबवून कोणीही प्रचारात भाग घेतलेला नाही. मंत्री २-२, ३-३ दिवस विधानसौधमध्ये जाऊन काम सांभाळत आहेत. मुख्यमंत्री म्हणून मी ज्या सूचना द्यायच्या त्या आमच्या मंत्र्यांना दिल्या आहेत. आरोप करणार्यांनी पूर्वी कशा पद्धतीने काम केले आहे हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे असा पलटवार बोम्मई यांनी केला.

भाजप, काँग्रेस प्रादेशिक पक्षांना संपवतील या माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना बोम्मई म्हणाले, जेडीएसला संपवण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही आमच्या पक्षाचे संघटन मजबूत करत आहोत. जेडीएसच्या माध्यमातून भाजप निवडणुकीत पैसे वाटतोय हा जमीर अहमद यांचा आरोप सत्यापासून दूर आहे, त्याला कोणताही आधार नाही असे बोम्मई यांनी सांगितले.

 

 

Tags: