मी पक्षामध्ये किंवा राजकारणामध्ये कोणत्याही इच्छेने आलो नाही. कोणतीही इच्छा असती तर मी बोलून दाखविली असती. मला पदाची गरज आहे असे मी कधीही उघडपणे बोललो नाही. पक्षाने दिलेली जबाबदारी नेहमीच पार पाडत आलो आहे आणि यापुढेही माझी जबाबदारी मी व्यवस्थितपणे पार पाडेन, असे स्पष्टीकरण दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांनी दिले आहे.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे बेळगावदौऱ्यावर आले असून या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार अभय पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले. माझ्यासाठी पक्ष महत्वाचा आहे. पक्षाने मला पारखून महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी दिली होती. पक्षाच्या चौकटीत राहून गेली ३१ वर्षे आपण राजकारणात आहोत. १९९० पासून आतापर्यंत पक्ष चौकटीत राहूनच आपण राजकारण करत असून बेळगावमध्ये भाजपचा झेंडा घट्ट रोवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे अभय पाटील म्हणाले ()
अभय पाटील यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभय पाटील म्हणाले कि, मुख्यमंत्री बेळगाव दौऱ्यावर आले असता आपल्यासोबत केवळ सामान्य चर्चा करण्यासाठी माझ्या निवासस्थानी आले होते. यापूर्वी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, अनंतरकुमार यांच्यासह अनेक भाजपचे नेते माझ्या निवासस्थानी येऊन गेले आहेत. बेळगाव दौऱ्यावर आलेले प्रत्येक भाजप नेते माझ्या निवासस्थानी भेट देतात, कार्यकर्ते भेट देतात, यात कोणतीही विशेष बाब नसल्याचे अभय पाटील यांनी स्पष्ट केले.


Recent Comments