महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी बेंगळूरच्या एका युवकाने राज्यभरात सायकलवरून जागृती मोहीम सुरु केली आहे. शनिवारी त्याने बेळगावात येऊन या संदर्भात जिलाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

होय, तुम्ही ज्याला पाहताय तो हाच युवक जो महिलांवरील अत्याचारांमुळे पेटून उठलाय. बेंगळूरच्या बसवणपूरचा रहिवासी असलेला किरण व्ही. बी. ए. च्या प्रथम वर्षाचा विध्यार्थी. ३५ दिवसांपूर्वी घर सोडून मोहिमेवर निघालेल्या किरणने २१०० किमीचे अंतर पार करून १५ जिल्ह्यांत सायकलवरून प्रवास केला आहे. शनिवारी बेळगावात दाखल झालेल्या किरणने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मीयतेने स्वागत केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना किरणने सांगितले की, महिलांवर अत्याचार करणारा कोणीही असो, त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली पाहिजे. या मागणीसाठी राज्यातील सर्व ३१ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्याची मोहीम हाती घेतली आहे. बेळगावात काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझे उत्स्फूर्त स्वागत केले आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. घर सोडून ३५ दिवस झाले आहेत, १५ जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले आहे असे सांगून आपल्या सायकल मोहिमेबद्दल अधिक माहिती दिली.
काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर म्हणाले, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना देहदंडाची शिक्षा देण्याची मागणी करणे हे आपले कर्तव्य आहे. यादृष्टीने किरण व्ही. यांच्या सायकल मोहिमेला सर्वानी सहकार्य करणे गरजेचे आहे.
एकंदर राज्यात, देशात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. ते रोखण्यासाठी दोषींना मृत्युदंड देण्याची मागणी समाजाच्या सर्वच थरांतून होत आहे. इतकेच काय विधिमंडळ अधिवेशनातही महिला आमदारांनी याविरुद्ध जोरदार आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आणखी एक कठोर कायदा आणावा, दोषींना फाशी द्यावी यासाठी राज्यभर सायकल मोहीम राबवून जागृती करणाऱ्या किरणच्या कार्याला दाद द्यावी लागेल.


Recent Comments