सार्वजनिक गणेशेत्सव परंपरेनुसार १० दिवसांचा साजरा करू द्यावा ही बेळगावातील गणेशोत्सव महामंडळाची मागणी तातडीने सरकारला कळविण्यात येईल. याबाबत सरकारकडून येणारे अंतिम निर्देश सर्वानी पाळावेत असे आवाहन जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी केले.

गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गणेशोत्सव महामंडळांचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ होते. गणेशोत्सव अगदी जवळ येऊन ठेपल्याने उत्सव मंडळांना संबंधित खात्यांच्या आवश्यक परवानग्या घेण्यासाठी त्या खात्यांशी चर्चा करून एक खिडकी व्यवस्था करून देण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोविड मार्गसूचीचे पालन सर्व मंडळांनी करावे, उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती निवारण कायद्यान्वये कारवाईची तरतूद मार्गसूचीत आहे. त्यामुळे उत्सव मंडळांनी याबाबत सहकार्य करावे. शेजारील महाराष्ट्रात कोरोनाचे थैमान पुन्हा वाढले आहे. कोरोना रोखण्यासाठीच सरकारने मार्गसूची आणली आहे. त्यामुळे सर्वानी त्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
यावेळी बोलताना लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, गेल्या २ वर्षांपासून कोविड मार्गसूचीचे पालन सर्व मंडळे करत आली आहेत. मात्र यंदा केवळ ५ दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची अट सरकारने घातली आहे. त्याला आमचा विरोध आहे. लसीकरणासह अन्य अटी पाळू, परंतु परंपरेप्रमाणे १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याची संधी दिली पाहिजे. ५ दिवसांचा मर्यादित गणेशोत्सव साजरा करण्याच्या निर्बंधामुळे गोंधळ उडाला आहे. तो दूर करावा अशी मागणी जाधव यांनी केली.

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या शहापूर विभागाचे अध्यक्ष व माजी नगरसेवक नेताजी जाधव म्हणाले, केवळ ५ दिवसांच्या गणेशोत्सवाला परवानगी दिल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला आहे. परंपरेलाच पायबंद घातल्यासारखे झाले आहे. त्यामुळे पारंपारिकरित्या १० दिवसांच्या गणेशोत्सवाला अनुमती द्यावी. उत्सवाला केवळ २-३ दिवस उरल्याने हेस्कॉम, पालिका व पोलीस खात्यातर्फे आवश्यक परवानग्या मंडळांना तातडीने मिळवून द्याव्यात अशी मागणी केली.
एक खिडकी पद्धतीने मंडळांना आवश्यक परवानग्या तातडीने द्याव्यात अशी मागणी सर्व मंडळांनी केली. त्याचप्रमाणे हिंदू परंपरा आणि हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन ५ दिवसांऐवजी परंपरेनुसार १० दिवसांचा गणेशोत्सव साजरा करू द्यावा अशी एकमुखी मागणी सर्व गणेश मंडळांनी केली. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. सीईओ दर्शन एच. व्ही., डीसीपी डॉ. विक्रम आमटे, अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, पालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व अधिकारी उपस्थित होते. त्याशिवाय बेळगावातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments