बेळगाव पत्रकार संघाच्या वतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बेळगावच्या विकासासंदर्भात महापौर, उपमहापौर आणि आमदारांसमवेत चर्चा झाली. तसेच महापालिकेच्या सभेत या विषयावर चर्चा करू, अशी हमीही यावेळी देण्यात आली.
बेळगाव पत्रकार संघाने वेगळ्या पद्धतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करून बेळगावच्या विकासासंबंधी विविध विषयांवर चर्चा घडवून आणली. यावेळी बेळगावमधील पाण्याची समस्या, ई-खाते, हुबळी-धारवाडला हिडकळ जलाशयातून पाणीपुरवठा अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधण्यात आला.
बेळगाव पत्रकार संघाच्यावतीने वेगळ्या स्वरूपाचा संवाद कार्यक्रम बेळगावच्या वार्ताभवनमध्ये आयोजित करण्यात आला होता. पत्रकार संघाचे प्रमुख विलास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, आमदार अभय पाटील आणि वार्ता व सार्वजनिक संपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्यावतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी महापौर मंगेश पवार यांनी कोणत्याही जाती, धर्म, भाषेचा भेद न करता विकासाच्या मंत्रासोबत काम करत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आमदार अभय पाटील यांनी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले. समाजाला दिशा देण्याचे कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचे त्यांनी यावेळी अभिनंदन केले.
बेळगाव महानगरामध्ये उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महापौर मंगेश पवार यांनी सांगितले की, सध्या बेळगाव महानगरात पाण्याची कोणतीही अडचण नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक प्रमाणात पाणीसाठा करण्यात आलेला आहे. मात्र, वीजपुरवठ्यातील व्यत्यय, तांत्रिक अडचणी आणि विकासकामांमुळे काही प्रमाणात पाणीपुरवठ्यात अडथळे येत आहेत. तसेच शहरातील बंद पडलेली बोरवेल्स दुरुस्त करण्यासाठी महानगरपालिकेकडून लवकरच उपाययोजना केली जाणार आहे. शिवाय बेळगाव उत्तरसाठी १४ आणि बेळगाव दक्षिणसाठी १४ अशा एकूण २८ पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.
तसेच आमदार अभय पाटील यांनीही सांगितले की, पाणीटंचाई दूर करण्यासाठी बोरवेल्स खोदण्यात आल्या आहेत. सुमारे ८० टक्के ठिकाणी पंपसेट बसवण्यात आले आहेत. काही ठिकाणी अस्तित्वात असलेल्या बोरवेल्सचं पुनर्जीवन करण्यात आलं आहे. २०५७ पर्यंत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून दीर्घकालीन योजना तयार करण्यात आली आहे. दरवर्षी लोकसंख्या वाढत असल्यामुळे आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा करून त्यात समतोल राखण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

संवाद कार्यक्रमात हुबळी-धारवाडला बेळगावच्या हिडकल जलाशयातून पाणीपुरवठा, ई-खाते यासारख्या अन्य विषयांवरही चर्चा झाली. महापौर, उपमहापौर आणि आमदारांनी या विषयावर महापालिकेच्या सभेत चर्चा करून उपाययोजना करू, अशी ग्वाही दिली.
या वेळी अध्यक्ष विलास जोशी, रवींद्र उप्पार, नौशाद विजापूर, राजशेखर पाटील, सुरेश नेर्ली, श्रीशैल मठद, राजू गवळी, कीर्ती शेखर कासरगोड, लुईस रॉड्रिग्ज यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments