बेळगावमधील सेकंड रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. . मात्र, स्थानिक रहिवाशांनी या उड्डाणपुलाच्या उभारणीला तीव्र विरोध केला आहे. या पुलामुळे फायद्यापेक्षा अडचणीच जास्त निर्माण होणार असल्याचे सांगत, स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला आहे.
बेळगावच्या सेकंड रेल्वे गेटवर उड्डाणपूल उभारण्यासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. परंतु, येथे उड्डाणपूल बांधल्यास विद्यार्थ्यांसह स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यासाठी पुरेशी जागा नाही. रस्ते आधीच अरुंद असल्याने पुलामुळे वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे. शाळा-कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पूल अडचणींचा ठरू शकतो. त्यामुळे, लोकप्रतिनिधींनी या मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून मगच निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून करण्यात आली आहे.
सध्या थर्ड गेटवरील उड्डाणपूलाचे काम ठप्प आहे. दुसरीकडे, सेकंड गेट येथून होणारी वाहतूक सुरळीत सुरू असून, येथे उड्डाणपूल उभारल्यास वाहतुकीची मोठी कोंडी होणार आहे. येथे उड्डाणपूल उभारल्यास अरुंद मार्गामुळे रहिवाशांना तसेच वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

येथे उड्डाणपूल बांधायचाच असेल, तर स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्ता (सर्व्हिस रोड) निर्माण करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. सरकारने जनतेच्या हिताचा आणि सोयीचा विचार करूनच पुढील पाऊल उचलावे, असे नागरिकांचे स्पष्ट मत आहे.


Recent Comments