Belagavi

बिडी गावचा कचरा बीडी- कित्तूर रस्त्यावर : आरोग्य धोक्यात

Share

खानापूर तालुक्यातील बिडी ग्रामपंचायत कार्य क्षेत्रातून जमा केला जाणारा कचरा बिडी -कित्तूर मुख्य रस्त्याकडेला टाकला जात आहे. यामुळे या भागात दुर्गंधी पसरली असून येथून ये- जा करणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना नाक मुठीत घेऊन चालावे लागते. या संदर्भात प्रसार माध्यमात बातमी देऊनही ग्रामपंचायत पी डी ओ आणि इतर अधिकाऱ्यांचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.

या कचऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे . मात्र, ग्रामपंचायत अधिकारी आणि पीडीओना याचे काहीच सोयरसुतक दिसत नाही. अनेकदा कळवूनही ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष नाही. या कचऱ्यामुळे इथे कुत्र्यांचा वावर वाढला असून रस्त्यावर वावरणाऱ्या कुत्र्यांमुळे एखादा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणानजीक एक तलाव आहे. कचऱ्याचे घाण पाणी तलावात शिरून तलावाचे पाणी दूषित होत आहे. बिडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कचऱ्याची विल्हेवाट बिडी- कित्तूर मुख्य रस्त्यावर केली जात असल्याने हा परिसर दुर्गंधी युक्त बनला आहे. कचऱ्यामुळे इथे कुत्र्यांचा वावरही वाढला आहे. यामुळे येथून ये-जा करताना शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन जावा लागतो.

कुत्र्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील परिस्थिती इन न्यूज च्या माध्यमातून याआधीही मांडण्यात आली होती. तरीही ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही. आजही येथील परिस्थिती जैसे थेच आहे, असे अरहान नामक व्यक्तीने या समस्येविषयी बोलताना म्हटले आहे.

खानापूर तालुक्यातील अधिकारी वर्गाला आणि बिडी ग्रामपंचायत पीडिओ, अध्यक्ष – उपाध्यक्षांना आता तरी जाग येईल का, स्वच्छता विभागाचे अधिकारी,जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे याकडे लक्ष देतील का ? असा सवाल नागरिकांतून केला जात आहे.

Tags: