अध्यादेश लागू करण्यात आला असला तरी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या उचापती अद्याप थांबलेल्या नाहीत. अध्यादेश बासनात गुंडाळून मायक्रो फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी लोकांना त्रास देत असून घरे बळकविणे, पैशांसाठी तगादा लावून घरात ठिय्या मांडून बसणे आदी प्रकार मायक्रो फायनान्सर कडून केले जात आहे. लोकांच जिने असह्य करणाऱ्या मायक्रो फायनान्सरचा वेळीच बंदोबस्त करावा अन्यथा त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांना हूसकावून लावू असा निर्वाणीचा इशारा शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी दिला आहे.
खानापूर तालुक्यातील केरवाड व गुंड्यानट्टी गावातील लोकांना मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी त्रास देत असल्याच्या तक्रारी आहेत. फायनान्स कंपनीचे कर्मचारी घरात घुसून लोकांना दमदाटी करीत असून कर्ज वसूल करण्यासाठी घरे बळकावली जात आहेत. कर्ज फेडण्यासाठी चार दिवसांचा वेळ मागितल्यास हे वित्त कर्मचारी पैसे भरल्याशिवाय घराबाहेर पडणार नाही असे सांगत घरात ठिय्या मारत आहेत.
खानापूर तालुक्यातच नाही तर बेळगाव तालुक्यातही असे प्रकार सुरू आहेत. कर्जदारांच्या घरात घुसून महिलांना शिवीगाळ करणे आणि त्रास देणे असे प्रकार फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केले जात आहेत. आम्हास कर्ज नको असे म्हणत असतानाही मागे लागून या लोकांनी कर्ज पुरवठा केला आणि आज कर्जफेडीसाठी तगादा लावला आहे. मायक्रोफायनान्स कंपन्या हप्ते भरण्यास मुदत देत नाहीत.
अध्यादेश बासनात गुंडाळून ते वावरतात. अध्यादेशाबद्दल बोलले असता सरकार असे अध्यादेश काढते. आम्हाला त्याची पर्वा नाही. तुम्ही कर्ज फेडलेच पाहिजे असे ते सांगतात असे शोभा मरीगौडर या महिलेने सांगितले आहे.
कर्जभरणा करण्यासाठी सध्या आपल्याकडे पैसे नाहीत. लवकरच पैसे भरू असे सांगितल्यावर, जा फाशी लावून घ्या, घरात तांदूळ कडधान्य असेल तर ते विकून अथवा भीक मागून पैसे फेडा असे मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. हे कर्मचारी महिलांचा अपमान करतात. खेड्यात काम नाही, पैसे भरण्यास आम्हाला थोडी मुदत द्या, अशी विनवणी केली असता ते अर्वाच्य शब्दात बोलतात, असे कर्ज घेतलेल्या शांता नामक महिलेने म्हटले आहे.
सक्तीने कर्ज वसुली करणाऱ्याविरोधात सरकारने कठोर पाऊले उचलावीत अशा आशयाचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे. तरीही मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी दमदाटी केली जात आहे. यापुढे मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांनी गोरगरिबांना कर्जवसुलीसाठी त्रास दिला. त्यांच्याकडे तगादा लावला तर मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश यांनी दिला आहे.
सरकारने मायक्रो फायनान्स विरोधात कायदे केले असले तरी, मायक्रो फायनान्सर अजूनही कर्जदाराच्या घरात घुसून रात्री उशिरापर्यंत त्यांना त्रास देतात. सरकारने अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई करावी. सरकारने केवळ कागदपत्रांद्वारे अध्यादेश जारी करू नये, तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्वरित आदेश जारी करावेत. कर्ज वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असे शेतकरी नेते बसनगौडा यांनी म्हटले आहे.
एखाद्याने मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले असेल, पण त्याला कर्ज भरणा करण्यात त्रास होत असेल तर अशा कर्जदारांना कर्ज भरणा करण्यासाठी अधिक वेळ द्यावा. काही एजंटांकडून ग्रामीण भागातील लोकांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सुमारे 350 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संदर्भात तपास जारी आहे. तपास संपतोपर्यंत कर्जदारांना त्रास देऊ नये अशी सूचना करण्यात आली आहे. तरीही तरीही मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागातील लोकांना त्रास देण्याचे प्रकार सुरूच आहेत. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन लोकांना त्रास देणाऱ्या मायक्रो फायनान्स कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. असे प्रकार घडल्यास लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले आहे.
कर्ज वसुलीसाठी जबरदस्ती केल्यास अथवा मानसिक छळ केल्यास दहा वर्षाची कठीण शिक्षा आणि पाच लाख रुपये दंड आकारण्याचा कायदा सरकारने जारी केला आहे. मात्र असा अध्यादेश जारी करूनही मायक्रो फायनान्स कर्मचारी तो अध्यादेश बासनात गुंडाळून वावरत आहेत, ही खेदाची बाब म्हणावी लागेल.


Recent Comments