लिंगायत समाजाच्या आंदोलनाला असंवैधानिक ठरवून मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी समाजाचा अपमान केला असल्याचा आरोप पंचमसाली स्वामीजींनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरित माफी मागावी आणि आपलं विधान मागे घ्यावं, अशी मागणी पंचमसाली स्वामीजींनि केली आहे.
त्यांनी आज बेळगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. बसवन्ना आणि आंबेडकर यांची नावे घेत सरकारने आमचं कौतुक जरी केलं असलं, तरी गेल्या दोन वर्षांत पंचमसाली आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न झाले आहेत. जर माझं आंदोलन असंवैधानिक आहे, तर तुमच्या मंत्रिमंडळातील सदस्य आमच्या आंदोलनात का सामील झाले? त्यांना त्यांच्या पदावरून हटवून त्यांचा राजीनामा मागावा,
” असं त्यांनी ठणकावून सांगितलं. जर आरक्षण देणं शक्य नसेल, तर स्पष्ट सांगा. आम्ही न्याय मिळवण्यासाठी योग्य व्यक्ती किंवा यंत्रणा शोधू. जनतेच्या न्यायालयात जाऊ. मात्र, 900 वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या लिंगायत समाजाचा अपमान करणे हे योग्य नाही, अशी स्पष्ट भूमिका स्वामीजींनी मांडली.
लिंगायत समाज हा नेहमीच जातीयतेच्या पलीकडे जाऊन अन्नदान आणि शिक्षणदान करत आला आहे. हा समाज संविधानाच्या उद्दिष्टांप्रमाणेच जीवन जगत आहे आणि प्रगती करत आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून तुम्ही दिलेली वक्तव्ये संविधानविरोधी आहेत. या विधानांमुळे तुम्ही लिंगायत समाजाचा आणि बसवन्नांचा अपमान केला आहे. त्यामुळे तात्काळ तुमची विधाने मागे घेऊन समाजाची माफी मागावी, असे आवाहन स्वामीजींनी केले.
आता पुढे पंचमसाली आरक्षण आंदोलनाला लिंगायत पंचमसाली आरक्षण क्रांती आंदोलन या नावाने पुढे नेले जाईल. लिंगायतांच्या आंदोलनाला असंवैधानिक म्हणणाऱ्या विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे अध्यक्ष या विधानांचा पुनर्विचार करून ती मागे घ्यावी. अंबेडकरांचे संविधान लिंगायतांनी संपूर्ण वाचले नसले तरी संविधानाच्या आधारावरच त्यांनी सेवा केली आहे.
स्वतः बाबासाहेबांनी सुद्धा सिद्धप्पा कंबळे यांच्या विजयासाठी प्रयत्न केले होते. 2020 मध्ये आंदोलन सुरू झाले तेव्हा तुमच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीच पाठिंबा दिला होता. जर आमचे आंदोलन असंवैधानिक होते, तर त्यावेळी तुम्ही त्यांना रोखले का नाही? वकिली व्यवसायातून आलेल्या तुमच्याकडून अशा प्रकारची विधाने अपेक्षित नाहीत, असे स्वामीजी म्हणाले.
या पत्रकार परिषदेत बी. एल. पाटील, निंगप्पा फिरोजी, आर. सी. पाटील, गुंडू पाटील, शिवानंद तंबाके, राजू मगदुम, रामनगौडा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments