Belagavi

आम. अभय पाटील यांनी केली पीबी रोड मार्ग खुला करण्याची मागणी

Share

बेळगाव महापालिकेच्या आज झालेल्या सभेत पीबी रोड मार्ग खुला करण्याचा विषय गाजला. या प्रकरणावरून उत्तर आमदार आसिफ सेठ आणि दक्षिण आमदार अभय पाटील यांच्यात शाब्दिक चकमक रंगली.

बेळगाव महापालिकेने पीबी रोड प्रकरणात 20 कोटी रुपयांचा दंड भरावा लागल्याने हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाचा फटका नागरिकांना बसत असल्याचे अधोरेखित करत दक्षिण आमदार अभय पाटील यांनी हा मार्ग तातडीने खुला करण्याची मागणी केली.

महापालिका परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत त्यांनी असे सांगितले की, “सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एक बाजू तरी नागरिकांच्या सोयीसाठी खुली करावी. यानंतर महापालिका कायद्यानुसार भूखंड हस्तगत करून मार्ग पूर्णपणे खुला करू शकते.”

परिषदेत या विषयावर चर्चा सुरु असताना उत्तर आमदार आसिफ सेठ आणि अभय पाटील यांच्यात वाद झाला. अभय पाटील यांनी वादावर बोलताना स्पष्ट केले की, “मला या प्रकरणात राजकारण करायचे नाही. तसेच आयुक्तांविरोधातही काही कारवाईची मागणी केली नाही. मात्र, जर राजकारण करायचे असेल तर मी तयार आहे.”

पीबी रोड मार्ग खुला करण्यावरुन महापालिकेत तणावपूर्ण चर्चा झाली आहे. या निर्णयासाठी महापालिकेची पुढील भूमिका नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Tags: