Belagavi

कंत्राटी तत्त्वावरील वाहन चालकांचे मनपासमोर आंदोलन

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी तत्त्वावरील वाहन चालकांनी आपली नोकरी कायम करण्याच्या मागणीसाठी महापालिकेसमोर आंदोलन केले.

गेल्या 20-25 वर्षांपासून बेळगाव महानगरपालिकेच्या कचरा व्यवस्थापनासाठी गाड्यांचे चालक कंत्राटी तत्त्वावर सेवा देत आहेत. मात्र, त्यांच्या सेवेला अद्याप शाश्वत मान्यता मिळालेली नाही. सफाई कर्मचाऱ्यांच्या थेट नियुक्तीच्या धर्तीवर आमच्याही सेवेला कायम करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

वाहन चालक विशाल चलवादी यांनी यावेळी सांगितले की, आम्ही 67 जण गेल्या दोन दशकांपासून महापालिकेच्या गाड्यांवर सेवा देत आहोत. जीव धोक्यात घालून काम करत असूनही आम्हाला शाश्वत नोकरीचे सुरक्षित आश्वासन दिले गेलेले नाही. आम्हाला त्वरित थेट नियुक्त करून नोकरी कायम करावी, अशी मागणी आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनादरम्यान, उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. त्यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या समवेत हा विषय उचलून धरून सकारात्मक प्रतिसाद मिळवण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनात कंत्राटी वाहन चालकांसह अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: