बेळगाव जिल्ह्यात चुलत्याच्या मृत्यूनंतर मुलांना मिळालेल्या इन्शुरन्सच्या पैशांच्या लोभापोटी भावाने स्वतःच्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली असून पोलीस अधिक तपास घेत आहेत, अशी माहिती एसपी डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी भागात एका भावाने इन्शुरन्सच्या पैशांसाठी भावाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली.
चुलत्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांना इन्शुरन्सचे पैसे मिळाले होते. हे पाहून आरोपी भावाने स्वतःलाही असे पैसे मिळावेत, म्हणून आपल्या मोठ्या भावाची हत्या केली. या प्रकरणात मुडलगी पोलिसांनी आरोपी भावासह अन्य तीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी खून केल्यानंतर पैशांच्या वाटणीची हमी दिली होती, असेही तपासात निदर्शनात आले आहे.
याशिवाय, गोकाक शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. मुडलगी रोडवरील कृष्णा नदीत सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणात हारुगेरी पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. मृत व्यक्तीची ओळख मल्लप्पा कंबर अशी पटली आहे. मृताची पत्नी दानम्मा हिचे अनैतिक संबंध हे खुनामागचे कारण असून तिच्या मित्रांच्या मदतीने मल्लप्पाला नदीत बुडवून ठार करण्यात आल्याचेही तपासात निष्पन्न झाल्याचे एसपी डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.


Recent Comments