Belagavi

अग्निवीरच्या चौथ्या तुकडीचा दीक्षांत समारंभ उत्साहात : ६५१ अग्निवीर देशसेवेसाठी सज्ज

Share

बेळगावच्या मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये आयोजित भव्य पथसंचलनाने चौथ्या तुकडीतील 651 अग्निवीर देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. 31 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणादरम्यान अग्निवीरांनी उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्यांचा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला.

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या मैदानावर 651 अग्निवीरांचे आकर्षक पथसंचलन संपन्न झाले. कमांडंट ब्रिगेडियर जॉय दीप मुखर्जी यांनी पथसंचलनाची पाहणी केली आणि अग्निवीरांना कर्तव्यासाठी शपथ दिली.

31 आठवड्यांच्या कठोर प्रशिक्षणादरम्यान अग्निवीरांना देशाच्या संरक्षणासाठी कठीण परिस्थितीत निभावायच्या जबाबदाऱ्या शिकवण्यात आल्या. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अग्निवीरांना ब्रिगेडियर मुखर्जी यांच्या हस्ते पदकांनी सन्मानित करण्यात आले. कर्तव्यासाठी सज्ज असलेल्या अग्निवीरांनी राष्ट्रध्वज, रेजिमेंटचा ध्वज आणि धार्मिक ग्रंथांसमोर कर्तव्यनिष्ठा, सेवाभाव आणि राष्ट्रप्रेमाचा शपथविधी केला.

यावेळी कमांडंट ब्रिगेडियर जॉय दीप मुखर्जी, यांनी बोलताना सांगितले, “मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये प्रशिक्षण घेणे ही गौरवाची बाब आहे. जीवनातील शिस्त, शारीरिक क्षमता आणि राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन देशाच्या सार्वभौमत्वासाठी स्वतःला समर्पित करावे, अशी माझी अपेक्षा आहे.

अग्निपथ योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षित झालेले हे 651 अग्निवीर देशसेवेत आपली निष्ठा आणि प्रामाणिकता दाखवतील याचा मला आत्मविश्वास आहे, असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात वरिष्ठ सैन्य अधिकारी, मान्यवर आणि अग्निवीरांचे कुटुंबीय उपस्थित होते.

Tags: