Belagavi

एकतर्फी प्रेमातून रुग्णालयात घुसून महिला डॉक्टरवर हल्ला!

Share

कोलकाता येथील महिला डॉक्टरवर हल्ला करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच बेळगावमध्ये एका प्रियकराने एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरवर हल्ला केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या घटनेचा धसका घेतलेल्या तरुणीच्या वडिलांनी भीतीपोटी आपले प्राण सोडले आहेत.

एकतर्फी प्रेमातून भ्रमनिरास झालेल्या युवकाने रुग्णलयात येऊन महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला आहे. बेळगावमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ माजली असून केवळ दैव बलवत्तर म्हणून तरुणीचे प्राण वाचले आहेत. मात्र मुलीवर झालेल्या हल्ल्याचा धक्का सहन न झालेल्या वडिलांना मात्र आपले प्राण गमवावे लागले आहेत. प्रकाश जाधव असे या माथेफिरू प्रियकराचे नाव असून सध्या त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांच्या कॉलनीत माथेफिरू प्रकाश जाधव राहात असे. यादरम्यान सदर डॉक्टर तरुणीचा पाठलाग करण्यास त्याने सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी प्रकाशने कुटुंबासमवेत डॉक्टर तरुणीच्या घरी लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र तरुणीच्या कुटुंबीयांनी लग्नाला नकार दिला होता. या घटनेमुळे भ्रमनिरास झालेल्या तरुणाने रुग्णालयात येऊन तरुणीवर हल्ला केल्याचे समजते आहे.

हि घटना ३० ऑगस्ट रोजी घडली होती. मात्र आज हि घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात खडेबाजार पोलिसांनी आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला आहे. या साऱ्या प्रकरणात मुलीवर झालेल्या हल्ल्याचा प्रकार वडिलांना सहन न झाल्याने त्यांनी आपले प्राण सोडले आहेत. यासंदर्भात पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबान्यांग यांनी अधिक माहिती दिली आहे.

Tags: