बेळगाव उत्तर विधानसभा मतक्षेत्रात विविध विकासकामांना विशेष अनुदानाच्या मदतीने सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने, स्थानिक समस्यांवर लक्ष देत, आमदार आसिफ़ सेठ यांनी रस्ते, गटारी आणि अन्य विकास कार्यांची सुरूवात केली.
काही दिवसांपासून शहरातील कामत गल्लीत येथील खराब झालेल्या रस्त्यांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्थानिक नगरसेवकांनी ही समस्या आमदारांच्या निदर्शनास आणून दिली . त्यानंतर मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या २५ लाख रुपयांच्या विशेष अनुदानातून इथल्या रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे . याबाबत आमदार आसिफ़ सेठ यांनी इन न्यूज ला माहिती दिली. यावेळी नगरसेविका कडोलकर तसेच स्थानिक उपस्थित होते .

त्यानंतर आमदार आसिफ सेठ यांनी विशेष अनुदानातून बेळगावातील कपिलेश्वर रोडवरील रस्ते विकास कामाचा शुभारंभ केला. ते म्हणाले की, अनेक दिवसांपासून येथील नागरिकांनी नगरसेवकांना तसेच अधिकाऱ्यांना रस्ता विकसित करण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर आजपासून या कामाला सुरुवात करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. येथील सर्व समस्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी नगरसेविका वैशाली भातकांडे, ज्येष्ठ नागरिक व स्थानिकांचा सहभाग होता. तसेच बेळगाव येथील वीरभद्रेश्वर नगर सातवा क्रॉस येथील अंतर्गत रस्त्यांची कामे विशेष अनुदानातून करण्यात येत आहेत. आज आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार म्हणाले की, विशेष अनुदानातून ही कामे करण्यात आली असून, उत्तर मतदारसंघात विकासाचे पर्व सुरु झाले आहे.
यावेळी नगर सेवक बाबाजान मतवाले यांच्यासह स्थानिकांचा सहभाग होता.


Recent Comments