Belagavi

कंग्राळी बुद्रुकचा किगदी तलाव फुटला; मात्र शेतकऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे अनर्थ टळला

Share

कंग्राळी बुद्रुक येथील किगदी तलावातील मोठ्या लोंढ्याचा प्रवाह ओढ्यातून थेट गावच्या पश्चिमेकडून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला मिळाल्याने तलाव फुटला. मात्र काही शेतकऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

किगदी तलाव फुटल्यामुळे शेतकरी वर्गाची तारांबळ उडाली. लाखो लिटर पाणी मार्कंडेय नदीला मिळाले. मात्र काही शेतकऱ्यांच्या कार्यतत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून ग्रा. पं. सदस्य व शासकीय अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या साहाय्याने फुटलेला तलाव बांधल्यामुळे शेतकरी वर्गाचा जीव भांड्यात पडला. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षामुळे तलाव फुटल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य आणि नागरिकांनी केला असून, तलाव फुटल्यामुळे नागरिकांतून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.

तलावाच्या पूर्व दिशेला अतिक्रमण झाल्याने हा प्रसंग ओढवल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पाणलोट ठिकाणावरुन पाणी न गेल्याने, आणि पूर्व दिशेला तलावाच्या बाजूने सपाट जागा झाल्यामुळे या सपाट जागेवरुन पाणी जाऊन तलाव फुटला. तलावाच्या पूर्व दिशेने बांध असता तर तलाव तुडुंब भरल्यानंतर उर्वरित पाणी पाणलोट ठिकाणावरुन जात राहाते. यामुळे तलावाला फुटण्याचा धोका होत नाही. परंतु तलावाच्या या परिस्थितीकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे सदर तलाव फुटल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत

संभाव्य धोका लक्षात घेत या आधीच अनेकवेळा पाटबंधारे खाते तसेच जिल्हा प्रशासनाकडे दाद मागण्यात आली. परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रसंग ओढावल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अशास्त्रीय बांधकामे व अतिक्रमण हे याचे मूळ असून संबंधित विभागाने किमान आता तरी जागे व्हावे, अशी प्रतिक्रिया ग्राम पंचायत सदस्य यल्लोजी पाटील यांनी इन न्यूजशी बोलताना व्यक्त केली आहे.

तलावाच्या ठिकाणी ग्राम पंचायत सदस्य जयराम पाटील, यल्लोजी पाटील, अनिल पावशे, तानाजी पाटील, उमेश पाटील, बंदेनवाज सय्यद, फारुख पठाण, सद्याप्पा राजकट्टी, सुरेश राठोड, पीडीओ रंगाप्पगोळ आदींनी जेसीबी मागवून पाणी बंद केल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तलावाच्या क्षेत्रफळाचे सर्वेक्षण करून अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पाटबंधारे खाते यांना ग्राम पंचायतीतर्फे निवेदन देण्याचे आश्वासन ग्रा. पं. सदस्यांनी दिले आहे.

Tags: