Banglore

मी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही: मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, माझ्यावर खटला चालवण्यामागे मोठे राजकीय षडयंत्र असून मंत्री आणि आमदार माझ्या बाजूने आहेत. राज्यपालांच्या या भूमिकेबाबत आपण कायदेशीर लढा देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी व्यक्त केली आहे.

बेंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना, मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, राज्यपालांनी माझ्यावरील खटल्यासाठी परवानगी दिली असून निवडून आलेले सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचाच हा प्रयत्न आहे. आपण राज्यपालांच्या निर्णयाचा आदर करतो. याचप्रमाणे कायदेशीर लढ्यासाठीही आमची तयारी आहे. राज्यपालांचा निर्णय घटनाबाह्य आहे. मी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राजीनामा देण्यासारखी चूक मी केलेली नाही, अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, निवडून आलेले सरकार पाडण्याचे कारस्थान अनेक राज्यांत रचले जात असून भाजप, जेडीएस व्यतिरिक्त इतर कोणीही आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत नाही. माझ्यावरील खटल्याबाबत राज्यपालांनी दिलेल्या निर्णयाबाबत आम्ही न्यायालयात जाब विचारू. हायकमांड, संपूर्ण मंत्रिमंडळ, सरकार, सर्व आमदार माझ्या पाठीशी उभे आहेत. राजभवनाचा वापर राजकीय फासे म्हणून केला जात असून राज्यपाल केंद्र सरकारच्या कठपुतळीसारखे वागत आहेत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप नेत्यांवर मुख्यमंत्र्यांनी सडकून टीका केली.

Tags: