राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली असून त्यांच्या या कृतीचा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी निषेध व्यक्त केला आहे. शिवाय भाजप एजंटप्रमाणे वागणाऱ्या राज्यपालांच्या या कृतीविरोधात रस्त्यावर उतरून लढा देऊ, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
आज बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात खटला चालवण्यास परवानगी दिली आहे. राज्यपाल हे राज्याच्या कायद्याची गुरुकिल्ली असतात. परंतु आपले राज्यपाल हे भाजपच्या हातचे बाहुले आहेत. मुडा जागा वाटपासाठी भाजप सरकारनेच परवानगी दिली असून हि बाब हे बेकायदेशीर असल्याचेहि भाजपचेच म्हणणे आहे, असे असिफ सेठ म्हणाले.
राज्यपाल भाजपचे एजंट म्हणून काम करत आहेत. त्यांच्या या कृत्याविरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरून कायदेशीर आणि राजकीय लढा देण्यास तयार असून सिद्धरामय्या यांच्या ४५ वर्षांच्या राजकीय जीवनात एकही काळा डाग नाही. मात्र, आज खटल्यासाठी परवानगी देण्यात आली, हि बाब निंदनीय आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
अन्य राज्यातील भ्रष्ट भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही? आपली जबाबदारी विसरून पक्षाचे एजंट म्हणून काम करणाऱ्या राज्यपालांना विरोध करणे हि सामान्य बाब आहे. सिद्धरामय्या यांनी काहीही चुकीचे केले नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत, असे ते म्हणाले.
यावेळी बेळगाव ग्रामीण काँग्रेस जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी यांच्यासह इतर काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments