बेळगावसह उत्तर कर्नाटक तसेच दक्षिण कर्नाटकातील पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले तर पर्यटनस्थळी वास्तव्यास असणाऱ्या जनतेचे जीवनमान सुधारेल, असे मत पर्यटन विभागाचे संचालक के. राजेंद्रन यांनी व्यक्त केले.
कर्नाटक पर्यटन विभाग आणि कर्नाटक टुरिझम सोसायटीतर्फे ‘कनेक्ट 2024’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन विभागाचे संचालक के. राजेंद्रन उपस्थित होते. व्यासपीठावर विभागाच्या सहसंचालिका सौम्या बापट, बेळगाव सांबरा विमानतळाचे संचालक डॉ. त्यागराजन, व्यावसायिक विठ्ठल हेगडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पर्यटन विभागाचे संचालक के.व्ही. राजेंद्रन म्हणाले, संचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर बेळगावात पहिला कनेक्ट कार्यक्रम आयोजित केला आहे, ही अभिमानाची बाब आहे. उत्तर कर्नाटकात प्रेक्षणीय स्थळे कमी असल्याचे सांगितले जाते. मात्र येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे असून इथल्या प्रेक्षणीय स्थळांकडे लक्ष वेधले पाहिजे. पर्यटन विभाग आणि टुरिझम सोसायटीने सर्वांच्या सहकार्याने कृती आराखडा बनवून येथील पर्यटन क्षेत्राचा विकास करायचा आहे. त्यामुळे स्थानिकांचे जीवनमान सुधारेल. बेळगाव हा तीन राज्यांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या लोकांना पर्यटनस्थळांकडे आकर्षित करण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हॉटेल असोसिएशनचे सदस्य, पर्यटक, हॉस्पिटॅलिटी स्किटधारक आदींचा सहभाग होता.


Recent Comments