महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात पाऊस ओसरल्याने बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पूर परिस्थितीचा धोका तूर्तास टळला असला तरी पुढील आठवड्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे
महाराष्ट्रातील कोयना, वारणा जलाशयातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नदीकाठी पूरसदृश्य परिस्थिती ओढवली होती. मात्र गेल्या ४ दिवसात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने बेळगाव जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील पूर परिस्थितीचा धोका तूर्तास टळला होता. बेळगाव मधील हिडकल आणि मलप्रभा जलाशय ९० टक्के भरल्यामुळे पुन्हा बेळगाव जिल्ह्यातील नदीकाठच्या ग्रामस्थांना पुराची भीती भेडसावत असून मुसळधार पाऊस सुरु झाला तर जलाशयातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरु होईल आणि यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कृष्णा नदीत सध्या २ लाख ५० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. घटप्रभा नदीत १० हजार क्युसेक तर मलप्रभा नदीत ५ हजार क्युसेक पाणी आहे. सात नद्यांच्या पाण्यामुळे बुडालेले जिल्ह्यातील बहुतांश पूल वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. विशेषत: गोकाक, मूडलगी, अथणी, चिक्कोडी, निप्पाणी तालुक्यातील काळजी केंद्रात असलेले लोक आपापल्या घरी परतले आहेत. त्यामुळे पुन्हा पावसाच्या अंदाजाने नदीकाठच्या ग्रामस्थांमध्ये पुराची भीती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील पावसाच्या प्रमाणावर जिल्हा प्रशासनाने आधीच लक्ष ठेवले असून पूरस्थिती कमी करण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यास सज्ज आहे.


Recent Comments