Belagavi

बळ्ळारी नाल्याचे पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Share

शहरातील पाण्याचा निचरा करणाऱ्या बळ्ळारी नाल्याला दरवर्षी पावसाळ्यात येणाऱ्या पुरामुळे नलपरिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून या नाल्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शेतकर्यांच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

गेल्या महिन्याभरापासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून बेळगाव शहरातील पाण्याचा निचरा वाहून नेणाऱ्या बळ्ळारी नाल्याला पूर आला आहे. परिणामी नलपरिसरात असणाऱ्या शेकडो एकर शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भागातील सुमारे ६०० एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून या नाल्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करत शेती सुधारणा युवक मंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. बळ्ळारी नाल्याला आलेला पुरामुळे केवळ शेतजमिनीचा नाही तर बोअरवेल आणि विहिरींना देखील समस्या निर्माण होत असून नाल्याचे काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

वडगाव, येळ्ळूर, शहापूर, अनगोळ, अलारवाड, मुचंडी या भागातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी शेतकरी कीर्ती कुलकर्णी बोलताना म्हणाल्या, बळ्ळारी नाल्याची खोली ३२ फूट आहे. पावसाचे आणि ड्रेनेजचे पाणी वाहून नेणारा हा नाला असून पावसाळ्यात या नाल्याला येणाऱ्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात हि समस्या निर्माण होत असून सत्तेवर येणाऱ्या प्रत्येक सरकारच्या काळात आम्ही हा प्रश्न मांडून आंदोलन केले. यासंदर्भात जिल्हा पालक मंत्र्यांनी बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. या समस्येवर तोडगा न निघाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी शेती सुधारणा मंडळाचे सदस्य रमाकांत कोंडुसकर, मनोहर हलगेकर, कीर्ती कुमार, अमोल देसाई आदींसह शेतकडो शेतकरी उपस्थित होते.

Tags: