संततधार पावसामुळे बेळगाव शहरातील विविध भाग जलमय झाले आहेत. आज बेळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांनी शहराचा दौरा करून आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बेळगाव शहरातील विविध भागांना भेटी देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला.

दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एप्रिल, मे आणि जून महिन्यात महापालिकेकडून शहरातील नाल्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच नाले व गटारांच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आले. महापालिका, जलमंडळ, स्मार्ट सिटी, वनविभाग, हेस्कॉम आदी अधिकाऱ्यांचे विशेष पथक शहरात सक्रिय असून आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागाचे पथक सज्ज आहे. आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. कोणत्याही मदतीसाठी पथकाशी त्वरित संपर्क साधता येईल.

बळ्ळारी नाल्याचे पाणी काही वस्त्यांमध्ये शिरून मोठे नुकसान होत आहे. नाला परिसरातील लोकांना समजवून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून शहरात 10 काळजी केंद्रे उघडण्यात आली आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करण्यात आले होते. मात्र पावसामुळे आता अनेक ठिकाणचे खड्डे उखडले असून लवकरच ते बुजविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली .

राकसकोप जलाशयातून अतिरिक्त पाणी सोडले जात असून खबरदारी घेतली जात आहे. बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की, हिंडलगा पंपहाऊस पाण्याखाली गेल्यास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक 24 तास कार्यरत असेल.
नगरसेविका सारिका पाटील यांनी बळ्ळारी नाल्याला लागून असलेल्या नागरी वस्त्यांना भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. आमदार अभय पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून 10 कोटी रुपयांच्या अनुदानातून नाल्याच्या विकासाचे काम हाती घेतल्याने अडचणीचे प्रमाण कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. पावसाची संततधार सुरू असूनही बेळगाव महानगरपालिकेचे सदस्य व आयुक्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


Recent Comments