अवघ्या तीन वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेला टिळकवाडी येथील तिसऱ्या गेट नजीकचा उड्डाणपूल सध्या समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. वरून पडणारा पाऊस आणि वाहने खड्ड्यात गेली कि खड्ड्यातून उडणारे पाणी यामुळे या ब्रिजवरून जाताना खड्ड्यांपासून वाचण्यासाठी नागरिकांना अक्षरशः छत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. ब्रिजच्या या दुरवस्थेकडे प्रशासन लक्ष देणार का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
हा पूल निर्माण करून अवघी तीनच वर्षे उलटली आहेत. परंतु या ब्रिजकडे पाहिल्यास वर्षानुवर्षे हा ब्रिज बांधण्यात आला असून यामुळेच या ब्रिजची अवस्था अशी झाल्याचा भास होतो. ब्रिजवर पडलेले खड्डे चुकवत मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांची मोठी कसरत सुरु आहे.
भाजपच्या कार्यकाळात धूमधडाक्यात आणि घिसाडघाईने उद्घाटन झालेल्या या पुलाला उद्घाटनानंतर आठवडाभरातच तडे गेले. विरोधकांनी हि बाब उचलून धरत निषेधही केला. मात्र प्रत्येक पावसाळ्यात या पुलाची अशी दुरवस्था होत असून या पुलासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

विविध भागांना जोडणाऱ्या पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने वाहनांची वर्दळ सुरु असते. यामुळे सातत्याने अपघात देखील घडत आहेत. वाहनधारकांची कसरत सुरु आहे. यामुळे या समस्येकडे लक्ष पुरवून जिल्हा प्रशासनाने हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी करण्यात येत आहे.
अवघ्या तीन वर्षातच या पुलाची दुरवस्था झाली असून या पुलासाठी वापरण्यात आलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही होत आहे. पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाळ्यात या पुलावरून जाताना नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी डागडुजीचे काम हाती घेण्याची मागणी पुढे येत आहे.
याच पुलावरून पुढे औद्योगिक वसाहतीत कामासाठी जाणारे कामगार ये-जा करतात. अनेक शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी देखील या मार्गाने जातात. येथील खड्ड्यांमुळे अनेकदा अपघात घडत असून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.
दर्जेदार काम होत नाही तेव्हाच अशा समस्या निर्माण होतात आणि त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हि समस्या लवकरात लवकर सोडवावी अशी मागणी बेळगावमधील नागरिक करत आहेत.
अपघात होण्यापूर्वी नवीन पुलावरील खड्डे बुजवावेत. लोकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.


Recent Comments