रणरणत्या उन्हात जिवाच्या काहिलीने हैराण झालेल्या बेळगावकरांवर आज झालेल्या यंदाच्या पहिल्याच वळवाच्या पावसाने थंडाईचा शिडकावा केला.
होय, गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून बेळगावात उन्हाचा तडाखा खूपच वाढला होता. त्यामुळे उन्हाच्या काहिलीने सगळेच बेळगावकर हैराण झाले होते. सकाळी ९-१० नंतर घरातून बाहेर पडायला नको वाटायचे. वाढलेल्या पाऱ्याचा परिणाम जनजीवनावरही झाला होता. ग्राहकांअभावी व्यापारी-व्यावसायिकांना व्यवहार आणि पर्यायाने उदरनिर्वाह चालविणे कठीण होऊन बसले होते. अशा स्थितीत आज शुक्रवारी या वर्षातील पहिलाच वळवाचा पाऊस काही काळ असेना का पण बरसला आणि त्याने उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांवर थंडाईचा शिडकावा केला. त्यासोबतच या वर्षातील पहिला मृदगंध बेळगावात दरवळला.

गेले काही दिवस वळवाचा पाऊस होईल अशी चिन्हे दिसत असूनही तो काही आला नव्हता. शुक्रवारी मात्र दुपारी ४-४.३० च्या सुमारास बेळगावच्या मध्यवर्ती भागासह टिळकवाडी, कंग्राळी खुर्द आदी परिसरात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. पावसाच्या सरी अपेक्षेइतक्या मोठ्या नसल्या तरी पावसाच्या शिडकाव्याने वातावरणात काही काळ गारवा पसरला. पावसादरम्यान रस्त्यावर तुरळक वाहतूक सुरु होती.


Recent Comments