Belagavi

मार्कंडेय नदीच्या प्रदूषणावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी

Share

खानापूर आणि बेळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी प्रदूषित झाले असून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.

होय, खानापूर तालुक्यातील बैलूर येथे उगम पावून बेळगाव तालुक्यातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीचे पाणी प्रदूषित झाल्याने शेतकरी आणि जनावरांचे खूप हाल आहेत. विशेषतः कंग्राळी खुर्दजवळ नदीपात्रात नाल्यातून येऊन मिळणाऱ्या सांडपाण्यामुळे ही समस्या उदभवली आहे. मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तू मोठ्या पुलाखाली टाकून दिल्याने नदीपात्रात कचऱ्याचा पसारा पडला आहे. त्यातच बेळगाव शहरातील अनेक उपनगरांचे सांडपाणी २ नाल्यांद्वारे मार्कंडेय नदीत मिसळत असल्याने आजूबाजूच्या शेत-शिवारातील पिकांवरदेखील दुष्परिणाम जाणवत आहे. या समस्येवर सरकारने कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

यासंदर्भात इन न्यूजशी बोलताना शेतकरी पुंडलिक पाटील यांनी सांगितले की, मार्कंडेय नदीचा उगम खानापूर तालुक्यातील बैलूर येथे झाला असून तेथून ही नदी वाहत बेळगाव तालुक्यात येते. राकसकोप येथे या नदीवर धरण बांधण्यात आले आहे. एका पुरुषाचे म्हणजेच मार्कंडेय ऋषींचे नाव असलेली बहुधा भारतातील एकमेव नदी असावी. सुमारे ४० मोठी खेडी या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण बेळगाव शहराचे सांडपाणी नदीत मिसळत असल्याने पाणी प्रदूषित झाले आहे. सदाशिवनगर, हनुमाननगर, सह्याद्रीनगर, शाहूनगर, मेडिकल कॉलेज, केएलई आदी ठिकाणचे सांडपाणी नदीतच २ नाल्यातून येऊन मिसळत असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्याचा फटका जनावरे, शेतकरी आणि पिकांनाही बसत आहे. सह्याद्रीनगरकडून १ व मार्केटयार्डकडून १ असे दोन नाले या नदीला येऊन मिळतात. पावसाळ्यात महापुरामुळे शेतीचे नुकसान होते तर उन्हाळ्यात नदीचा प्रवाह कमी झाला तरी सांडपाणी मिसळल्याने काठावरच्या शेतीतील उन्हाळी पिकांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.

मार्कंडेय नदीच्या काठावरील राकसकोपपासून ते बेळगुंदी, उचगाव, हिंडलगा, कंग्राळी खुर्द व बुद्रुक, होनगा, काकती आदी ४० गावातील शेतकरी या नदीच्या पाण्यावर ऊस, भात, जोंधळा, रताळी, बटाटे, मिरची, कोबी, फ्लॉवर, लालभाजी आदी पिके घेतात. नदीच्या दूषित पाण्यामुळे या पिकांवर देखील दुष्परिणाम दिसून येत आहे. शेतकरी केवळ पावसाळ्यातच जनावरे धुणे किंवा त्यांना पाणी पाजण्यासाठी नदीच्या पाण्याचा वापर करतात. दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नाल्याचे पाणी जेथे नदीला येऊन मिळते तेथे फिल्टर प्लांट उभारून शुद्ध करून नदीत सोडावे, यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा अशी मागणी त्यांनी केली.

एकंदर, फिल्टर प्लांट उभारून मार्कंडेय नदीचे प्रदूषण रोखावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आता मायबाप सरकार याची कधी दखल घेणार आणि उपाययोजना करणार याची प्रतीक्षा करावी लागेल.

Tags: