ज्येष्ठ नागरिकांची वृद्धाप वेतन, विधवा वेतन, अपंग वेतन अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पेन्शन्सची रक्कम मिळणे ४ महिन्यांपासून बंद झाल्याने लाभार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळे बेळगाव वन केंद्रात आधारकार्ड आणि पोस्ट व बँक अकाउंट रिलिंक करण्यासाठी लाभार्थ्यांची गर्दी होत आहे.
होय, बेळगाव जिल्ह्यात आणि तालुक्यातील विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या ४-५ महिन्यांपासून पेन्शन मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यांवर संकट कोसळले असून आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. सरकारने योजनांची रक्कम व पेन्शन थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरवात केल्याने आधारकार्ड व बँक खाते लिंक करणे सक्तीचे केले आहे. त्यामुळे या कामासाठी लाभार्थ्यांनी आता बेळगाव वन केंद्रांमध्ये गर्दी करून रांगा लावण्यास प्रारंभ केला आहे.
या संदर्भात इन न्यूजशी बोलताना वृद्धापवेतन योजनेचे अनगोळ येथील लाभार्थी अनंत संगोराम यांनी सांगितले की, मी ७५ वर्षांचा असून दरमहा १२०० रुपये वृद्धापवेतन पेन्शन मिळते. माझा औषधपाण्याचा खर्च त्यावरच चालतो. पण गेले सुमारे ४ महिने पेन्शनची रक्कम माझ्या पोस्टाच्या खात्यात जमा झालेलीच नाही. त्यामुळं माझी अडचण होत आहे. आधारकार्ड, केवायसी सर्व काही लिंक केले आहे. तरीही पेन्शन जमा झाली नसल्याने तहसीलदार साहेबाना भेटण्यासाठी आलो होतो. पण ते नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
आणखी एकाने सांगितले की, माझी आई ८५ वर्षांची असून, पेन्शन बंद झाली आहे. त्यातच माझे कामही सुटल्याने पैशांची अडचण येत आहे. त्यामुळे आईच्या औषधपाण्याचा खर्च चालवणे कठीण झाले आहे. अष्टे येथील दुर्गाप्पा गाडीवड्डर यांनी सांगितले की, मला मुलेबाळे नाहीत. त्यातच मला अर्धांगवायू जडल्याने मला कामही करता येत नसल्याने माझी अवस्था बिकट आहे. वृद्धापवेतनाच्या पेन्शनवरच मी अवलंबून आहे. पण गेल्या ४ महिन्यांपासून पेन्शनची रक्कम मिळत नसल्याने मला कसे जगावे कळेनासे झाले आहे. सरकारने लवकरात लवकर माझी पेन्शन सुरु करावी अशी मागणी त्यांनी केली.

राजश्री सहदेव हंचीनमनी या महिलेने सांगितले की, माझी मुलगी अपंग असून तिला दरमहा १४०० रुपये अपंगवेतन मिळते, तर मला दरमहा १२०० रुपये विधवा पेन्शन मिळते. मात्र गेल्या ४ महिन्यांपासून दोन्ही पेन्शन बंद झाल्याने आम्हाला चरितार्थ चालविणे अवघड बनले आहे. सरकारने त्वरित आम्हाला पेन्शन सुरु करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, बेळगाव वनच्या कॉम्युटर देता ऑपरेटर जान्हवी यांनी सांगितले की, सरकारने सर्वच पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतल्याने आधारकार्ड, कागदपत्रे आणि बँक अकाउंट रिलिंक करून केवायसी केली पाहिजे. यात काही तांत्रिक अडचणी येत असल्याने पेन्शन मिळणे बंद झाले असावे. पण ती सर्वांना मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले.
एकंदर ४-५ महिने पेन्शन न मिळाल्याने सर्वच कल्याणकारी योजनांच्या पेन्शनधारकांची कुचंबणा होत आहे, हे सत्य आहे. मायबाप सरकारने यातील अडचणी दूर करून पेन्शनधारकांना दिलासा द्यावा हीच सर्वांची अपेक्षा आहे.


Recent Comments