अल्पसंख्याकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, या उद्देशाने काँग्रेस पक्ष दहशतवाद्यांना संरक्षण देण्यात गुंतला आहे, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये काल, शुक्रवारी झालेल्या स्फोटावर शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अशा घटनांना सरकारने अधिक जबाबदारीने हाताळावे, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली.
इतक्या गंभीर घटनेनंतरही काँग्रेसचे मंत्री जणू काही झालेच नाही असे वागले. तोंडावर येताच ते विधान करत आहेत. या सर्व प्रकारामुळे काँग्रेस पक्षाबाबत संशय निर्माण झाल्याचे विजयेंद्र म्हणाले. रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणावर आम्ही राजकारण करणार नाही. जबाबदार विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा देऊ, पण राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले आहे आणि पराभव झाकण्यासाठी काँग्रेसचे मंत्री तोंडाला येईल ते बरळत आहेत, अशी टीका बी. वाय. विजयेंद्र यांनी केली.
भाजप अजूनही राज्यातील काँग्रेस आमदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करत असल्याच्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या आरोपाला बी. वाय. विजयेंद्र यांनी प्रत्युत्तर दिले. सरकार पाडण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, मतदारसंघाच्या विकासासाठी निधी नाही, त्यामुळे मतदारसंघातील जनतेसमोर त्यांचा चेहरा ते दाखवत नाहीत, असे त्यांचे आमदारच बोलत आहेत, असा पलटवार विजयेंद्र यांनी केला.


Recent Comments