आपल्या वार्डातील लोकांची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी स्वतः नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी ८० फुटांच्या विहिरीत उतरून झऱ्यांची पाहणी करून आणखी १५ ते २० फूट खोदाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावर्षी पावसाने धोका दिल्याने अनेक कूपनलिका आणि विहिरींचे पाणी आतले आहे. पातळी कमी होत आहे. आगामी ३ महिन्यात बेळगाव शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आपल्या वार्डातील लोकांना त्रास होऊ नये म्हणून वार्ड न २ चे नगरसेवक व बेळगाव मनपा विरोधी गटनेते मुजम्मिल डोणी यांनी पाणी प्रश्न गांभीर्याने घेऊन आपल्या वार्डातील सर्व विहिरीद्वारे लोकांना कसे सुरळीत पाणी पोहोचेल याची काळजी घेत आहेत.
खंजर गल्ली-कचेरी गल्ली कोपऱ्यावर जुन्या काळापासून असलेल्या विहिरीतून शहराच्या मध्यवर्ती भागाला पाणी पुरविण्यात येत होते. २००७मध्ये पहिल्यांदा मुजम्मिल डोणी जेंव्हा नगरसेवक झाले, तेंव्हा स्थानिक वार्डातील लोकांनी पाणीसमस्येबद्दल त्यांना सांगितले. तेंव्हा प्रथमच या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि त्यात यशही मिळाले. २०१५ मध्ये या विहिरीची आणखी २५ फूट खोदाई करण्यात आली. त्यामुळे आणखी जास्त पाणीसाठा उपलब्ध झाला.
यासंदर्भात आपली मराठीशी बोलताना मुजम्मिल डोणी यांनी सांगितले की, यावर्षी पाण्याची समस्या तीव्र होणार असून, लोकांना खूप त्रास होणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या खंजर गल्लीतील विहिरींची पुन्हा खोदाई करण्याचे काम सुरु केले आहे. हे काम १५ दिवस चालणार आहे. या भागातील सर्व नागरिकांनी १५ दिवस पाणी जपून वापरून सहकार्य करावे. खोदाईनंतर आम्हाला नक्कीच आणखी जास्त पाणी उपलब्ध होणार आहे. बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, खरोखरच मुजम्मिल डोणी यांचे कार्य कौतुकास्पद आहे. नक्कीच या खोदाईनंतर या विहिरीला आम्हाला जास्तीतजास्त पाणी उपलब्ध होईल असे सांगितले. विहीर खोदाई कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी विहिरीत ८० फूट खोल आत उतरून झऱ्यांची पाहणी केली आणि हे पाणी पिण्यासाठी योग्य असल्याचे सांगितले.
एकंदर, येत्या ३ महिन्यात फक्त बेळगाव शहरालाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला पाण्यासाठी खटाटोप करावा लागणार आहे. त्यामुळे जिथे-जिथे अशा विहिरी आहेत, तेथे आतापासूनच खोदाई केली तर येणार उन्हाळा पाण्याच्या त्रासाविना सुसह्य होऊ शकेल.


Recent Comments