Belagavi

शांताई वृद्धाश्रमाचे आजी-आजोबा विमानाने मुंबईला रवाना

Share

बेळगावातील शांताई वृद्धाश्रमाचे आजी-आजोबा पाच दिवसांच्या सहलीसाठी विमानाने मुंबईत दाखल झाले. देशाच्या आर्थिक राजधानीत पाऊल ठेवल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या फाईव्ह स्टार हॉटेल ‘ताज’मध्ये चहा पिण्याचा आनंद त्यांनी लुटला.

होय, उद्योजक विजय पाटील व कुटूंबियांनी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे व इतरांच्या सहकार्याने गेली २५ वर्षे बेळगावातील बामणवाडी येथे निस्वार्थ, सामाजिक भावनेने शांताई वृद्धाश्रम चालविला आहे. या काळात समाजातील निराधार वृद्धांना आपुलकीची माया देत आसरा दिला आहे. बस, रेल्वेने अनेक ठिकाणी प्रवास घडवून आणला आहे. पण यंदा प्रथमच त्यांना विमान प्रवास घडवून सहलीला नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज बेळगावातून वृद्धाश्रमातील आजी-आजोबा विमानाने मुंबईला रवाना झाले.

बेळगावातील चन्नम्मा चौकातील कन्नड साहित्य भवनाच्या आवारात सर्व आजी-आजोबाना आणून सूचना देण्यात आल्या. वृद्धाश्रमाचे कार्याध्यक्ष माजी महापौर व सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी विमान प्रवासात आणि मुंबईतील वास्तव्यात काय काळजी घ्यायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मुंबईतील बीच जुहू चौपाटीवर गेल्यावर प्रत्येकाने आपले ओळखपत्र गळ्यात घालावे, दिलेल्या विशिष्ट टोप्या परिधान कराव्यात तसेच चुकामुक झाल्यास चौपाटीवर रोवलेल्या शांताई वृध्दाश्रमाच्या झेंड्याजवळ जमावे आदी सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी इन न्यूजशी बोलताना विजय मोरे यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी उद्योजक व समाजसेवक विजय पाटील यांच्या मातोश्री शांताई यांच्या नावाने बामणवाडीजवळ हा वृद्धाश्रम सुरु करण्यात आला. सरकारकडून एक पैसाही मदत न घेता दानशूरांच्या, बेळगावकरांच्या मदतीने हा वृद्धाश्रम चालविण्यात येतो. येथे वृद्धांची आपुलकीने काळजी घेत विविध माध्यमातून त्यांचे मनोरंजन करत त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ सुसह्य केली जाते. त्यांना यापूर्वी अनेकदा बस, रेल्वेने तसेच समुद्र सफर घडवून सहली आखण्यात आल्या आहेत. मात्र विमानप्रवास घडवण्याचे स्वप्न राहून गेले होते. विजय पाटील यांचे मुंबईतील उद्योजक मित्र अनिल जैन एकदा बेळगावात लग्नसोहळ्याला आले असता, त्यांनी वृध्दाश्रमाला भेट देऊन वृद्धांना विमान प्रवास करून मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.

त्यांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर आम्ही दानशूर उद्योगपती स्टार उद्योगसमूहाचे प्रमुख संजय घोडावत यांची भेट घेऊन संकल्पना मांडली. त्यांनी आनंदाने आपल्या स्टार एअरजेटचे विमान उपलब्ध करून दिले. त्यामुळे आज आम्ही या ज्येष्ठ नागरिकांना मुंबईची विमानाने सफर घडवून आणत आहोत. पाच दिवसांच्या काळात या ज्येष्ठांसाठी मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये चहापान, गेटवे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी आदी प्रेक्षणीय स्थळांना भेटी घडवून आणण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रसिद्ध मराठी हास्य कलाकार भाऊ कदम यांच्या विनोदी कार्यक्रमाचा आनंद मिळवून देण्यात येईल. एकूण ४२ जण मुंबई सहलीला जात असून त्यात ३१ आजी-आजोबांचा समावेश आहे. उर्वरित ११ जणांत समाजसेवक, वृद्धाश्रमाचे संचालक आणि काळजीवाहूंचा समावेश आहे. २६ फेब्रुवारीला आम्ही बेळगावात परतणार आहोत.

यानंतर सर्व आजी-आजोबा बसने सांबरा विमानतळाकडे रवाना झाले. तेथून स्टार एअरजेटच्या विशेष विमानाने ते मुंबईत दाखल झाले. मुंबईत पोहोचल्यावर आजी-आजोबानी देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि महागड्या फाईव्ह स्टार हॉटेल ताजमध्ये चहापानाचा आनंद लुटला.

Tags: