Belagavi

कठीण लक्ष्य गाठण्यासाठी शिवरायांनी केला अनेक संकटांचा सामना : अनिल ओक

Share

छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्य निर्माणासाठी प्रत्येक जाती-जमातीचे मावळे प्राण देण्यास तयार होते. जीवनात कठीण लक्ष गाठण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक संकटाचा सामना केला. प्रसंगी कठोर निर्णय घेतले. नकारात्मक गोष्टीतून अनेकदा सकारात्मक कामे करण्याचे सामर्थ्य केवळ छत्रपती शिवरायांना लाभले होते, असे गौरवोद्गार रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख अनिल ओक यांनी मांडले.

बेळगावात मराठा मंदिर, सरस्वती वाचनालय आणि जनकल्याण ट्रस्ट बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून अनिल ओक बोलत होते. व्यासपीठावर अखिल भारतीय वाल्मिकी सनातन धर्मसभा उज्जैनीचे राष्ट्रीय अध्यक्ष प. पू. बालयोगी उमेशनाथ महाराज, रा. स्व. संघ कर्नाटक उत्तर प्रांत कार्यकारणी सदस्य रवींद्र, जनकल्याण ट्रस्टचे अरविंद देशपांडे, मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव उपस्थित होते.

अनिल ओक पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेसाठी प्रसंगी दोन पावले मागे हटले. मात्र, त्याच ताकतीने पुढे जाऊन शत्रुंना पाणी पाजले. जीवनातील कठीण लक्ष्य गाठण्यासाठी त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. स्वराज्याचे सुराज्यात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य छत्रपती शिवरायांमध्ये होते. सकारात्मक प्रेरणा देण्याचे कौशल्य, कुशल प्रशासक, दूरदृष्टी, युद्ध कौशल्य, सुप्रशासन देणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज होते, असे अनिल ओक यांनी सांगितले.

बालयोगी उमेशनाथ महाराज म्हणाले, त्या काळात साधने नव्हती. मात्र, साधना होती. त्याद्वारे शत्रूंशी त्यांनी लढा दिला. आज अनेक साधने उपलब्ध असली तरीही युवा पिढी भरकटली आहे. युवामध्ये देशभक्तीपर जागृती आणि सनातन धर्माविषयी आस्था निर्माण करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले, आणि आपले कर्तव्य काय, हे जाणले पाहिजे. त्या दिशेने मार्गक्रमण करणे गरजेचे असल्याचे महाराजांनी यावेळी सांगितले.

रवींद्र यांनी हजारो वर्षाच्या आक्रमणानंतर स्वातंत्र्य व संस्कृतीचे रक्षण करणारा एकमेव हिंदू राजा छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे सांगितले. 350 व्या वर्षीही राज्याभिषेक सोहळा साजरा करून घेणारा जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी असल्याचे रवींद्र यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा पा. स्वरूपा इनामदार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. योगेश रामदास यांनी गीत गायले. अर्चना गोरे, गजानन घाटगे, वैदेही आदींच्या वतीने ‘हे हिंदू सिंह प्रभू शिवाजी राजा’ हे सामूहिक गीत गाण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र एडके यांनी केले. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी आभार मानले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

Tags: