विज्ञानाची प्रगती जसजशी वाढते, तसतसे देशातील लोकांचे जीवनमान सुधारते. सध्या भारत विज्ञान क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत असून 2035 पर्यंत भारताचे अंतराळात स्वतःचे अंतराळ स्थानक असेल. त्याशिवाय 2040 पर्यंत भारतीय चंद्रावर पाऊल ठेवतील, असे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. हिरीयन्ना यांनी सांगितले.
बेळगावातील श्री सिद्धरामेश्वर पदवीपूर्व विज्ञान महाविद्यालयात राज्य विज्ञान परिषद, बेळगाव विज्ञान केंद्र आणि शालेय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित लेखी प्रश्नमंजुषा स्पर्धा आणि विद्यार्थी-वैज्ञानिक थेट संवाद कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सरकारने विद्यार्थी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम बंद केला असला तरी डॉ. अल्लामा प्रभू महास्वामी यांनी, जिल्ह्यातील विद्यार्थी वैज्ञानिक ज्ञानापासून वंचित राहू नयेत, यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे, हे कौतुकास्पद आहे. समारंभात संसाधन व्यक्ती म्हणून सहभागी झालेले डीआरडीओ आणि इस्रोचे निवृत्त शास्त्रज्ञ एन.एस. कुमार म्हणाले की, विज्ञान क्षेत्रात सध्या भरपूर संधी उपलब्ध आहेत आणि विद्यार्थ्यांनी भविष्यातील शास्त्रज्ञ होण्यासाठी पीयू आणि पदवी स्तरावर मूलभूत विज्ञान निवडले पाहिजे.

नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी म्हणाले की, तरुणांनी वैज्ञानिक भावना विकसित करून समाज घडवण्याच्या कामात स्वतःला सहभागी करून घेतले पाहिजे. अत्यंत कमी खर्चात दर्जेदार विज्ञान शिक्षण मिळावे यासाठी सिद्धरामेश्वर इंटिग्रेटेड सायन्स प्री-ग्रॅज्युएट कॉलेज नव्याने सुरू करण्यात आले असून त्याचा विध्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव असोसिएशन फॉर सायन्स एज्युकेशनचे सचिव के.बी. हिरेमठ प्रभारी होते. यावेळी व्यासपीठावर प्री-ग्रॅज्युएट कॉलेजचे प्राचार्य सिद्धराम रेड्डी, व्याख्याते प्रभू शिवनायक उपस्थित होते. प्री-ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या स्वप्ना जोशी यांनी स्वागत केले. राजशेखर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. व्याख्याता पवित्रा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमात बेळगाव शहर व ग्रामीण भागातील 500 विद्यार्थ्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला.


Recent Comments