विधी व्यवसाय हा प्रतिष्ठेचा व्यवसाय असून आदर्श नागरिक घडविण्यासाठी व समाजसेवा करण्यासाठी विधी शिक्षण आवश्यक आहे, असे मत पंचायत राज विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. एस. व्ही. नाडगौडर यांनी व्यक्त केले.
बेळगावातील प्रतिष्ठित राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यावर कुलगुरु डॉ. नाडगौडर बोलत होते. यावेळी त्यांनी आरएल लॉ कॉलेजच्या वारशाचा अभिमान व्यक्त केला. सध्याच्या युगात विधी व्यवसाय स्पर्धात्मक बनला आहे. परंतु बारकाईने लक्ष देऊन केल्यास या व्यवसायात देखील यश मिळू शकते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष एम. आर. कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना विधी व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार यांनी या महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल असेल अशी ग्वाही पालकांना दिली.

महाविद्यालयाच्या आयक्यूएसी विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात विभागाचे समन्वयक डॉ. समिना बेग, प्राध्यापक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थिनी सुनिधी जोशी हिने मान्यवरांचा परिचय करून दिला. डॉ. समिना बेग यांनी स्वागत, नेहा व अनुजा यांनी सूत्रसंचालन केले तर रुचित्रा यांनी आभार मानले.


Recent Comments