खानापूर शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्टेशन रोडची तर अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना चालणे, दुचाकी व अवजड वाहने चालणे कठीण झाले आहे. या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याच्या मागणीचे निवेदन कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेस कमिटीकडून तहसीलदार प्रकाश गायकवाड व आ. विठ्ठल हलगेकर यांना देण्यात आले.

कर्नाटक प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या राज्य सरचिटणीस मेघना देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर शहरातील रस्ते अतिशय खराब झाले असल्याने रस्त्यावर धुळीचे लोट उठत आहेत. त्यामुळे नागरिकांना श्वास घेणे कठीण होत आहे. मुरगोड प्लॉट, विद्यानगर आदी सर्वच भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पी.डब्ल्यू.डी. व नगर पंचायत खानापूर यांना आमची समस्त महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने विनंती आहे की, त्यांनी सांगितलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून सर्व खानापूरवासीयांना दिलासा द्यावा. ऑटो रिक्षा कमिटी, टेम्पो वाहन समितीचे सहकार्य आणि रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी इतर संघटना आणि समित्यानीही या मागणीला पाठिंबा दिला आहे.
या वेळी मंजुनाथ सातेरी, नरसिंह गौरवण्णावर, प्रकाश काद्रोळी, मोहन पाटील, माजीद डंबळकर आदी उपस्थित होते.


Recent Comments