Banglore

काँग्रेस सरकार कर्नाटकबाबत मगरीचे अश्रू ढाळत आहे : विजयेंद्र

Share

एकामागून एक ढोंग करून केंद्र सरकारला दोष देण्याचे काम काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या करत आहेत. काँग्रेस आता केंद्र सरकारला कर्नाटकविरोधी म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी सोडले.

यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र म्हणाले की, गेल्या 14 वर्षांपासून कर्नाटकच्या चित्ररथांना प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये सतत संधी दिली जात आहे. अन्य राज्यांना संधी देण्याच्या उद्देशाने यावेळी कर्नाटक, गोव्यासह चार-पाच राज्यांना संधी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. संचलनामध्ये नसले तरी राज्य स्थिरचित्रांना सादरीकरणामध्ये सहभागी होण्याची परवानगी आहे.

कोणत्याही राज्यासोबत भेदभाव होणार नाही याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. ही बाब अगोदरच माहीत असल्याने गेल्या वेळी राज्यातील नेत्यांनी प्रयत्न करून ही संधी दिली होती. या वेळी वेळ आणि परिस्थितीचाही आढावा घ्यावा लागेल, असे ते म्हणाले.
जमीन, नदी आणि भूजल प्रश्नावर काँग्रेस सरकार कर्नाटकासाठी मगरीचे अश्रू ढाळत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कावेरीचे पाणी तामिळनाडूत वाहून जात असून, याबाबत ठोस भूमिका त्यांना घेता आलेली नाही, अशी टीका त्यांनी केली.

भाषा आणि राज्यासाठी लढणारे करवे अध्यक्ष नारायण गौडा यांच्या मुद्यावर काँग्रेस सरकार कसे वागत आहे, याकडे राज्यातील जनता पाहत आहे. बेळगाव हे स्वातंत्र्यापूर्वी महाराष्ट्रात होते, असे म्हणणाऱ्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी बी.वाय.विजयेंद्र यांनी केली.

Tags: