केएलई संस्थेमुळे बेळगाव कर्नाटकात राहिले अन्यथा ते महाराष्ट्रात गेले असते असे केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे यांनी सांगितले. बेळगावात केएलई संस्थेच्या राजा लखमगौडा (आरएलएस) विज्ञान महाविद्यालयात आज, शनिवारी कर्नाटक नामकरणाला 50 वर्षे झाल्यानिमित्त कन्नड नुडी वैभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उदघाटन केल्यावर ते बोलत होते.

प्रभाकर कोरे पुढे म्हणाले की, एकेकाळी बेळगावात कर्नाटक राज्योत्सवादिवशी केवळ केएलई आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरच विद्युत रोषणाई केली जायची. बाजारात कन्नड बोलले जात नसे. कन्नड चित्रपटांना थिएटर उपलब्ध होत नव्हते. पण केएलई संस्थेमुळे हे चित्र बदलले. बेळगावात कन्नडचा प्रचार आणि प्रसार होण्यात केएलई संस्थेच्या शिक्षकांचे योगदान मोठे आहे. एस. डी. इंचल, डी. एस. कर्की अशा कन्नड कवींनी बेळगावात कन्नडचा वापर वाढवला. ज्ञानपीठ विजेते कन्नड साहित्यिक चंद्रशेखर कंबार केएलईचे माजी विध्यार्थी आहेत. मातृभाषा कन्नडचे वैभव, कर्नाटकाचा इतिहास, संस्कृती नव्या पिढीला कळावी यासाठी या कन्नड वैभव कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना कर्नाटक विधान परिषदेचे माजी सरकारी प्रतोद महांतेश कवटगीमठ म्हणाले की, भाषावार प्रांतरचनेवेळी तत्कालीन मुंबई कर्नाटकात असलेल्या बेळगावचा तत्कालीन म्हैसूर राज्यात समावेश केला गेला. 1972मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवराज अरस यांनी म्हैसूर राज्याचे कर्नाटक असे नामकरण केले. त्याला यंदा 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केएलई संस्थेच्या आरएलएस विज्ञान महाविद्यालयात कन्नड वैभव हा कार्यक्रम आयोजित केला ही आनंदाची बाब आहे.

जे मातृभाषेवर प्रभुत्व मिळवू शकतात तेच अन्य भाषांवर प्रभुत्व मिळवू शकतात. त्यामुळे मातृभाषा कन्न्डवर प्रेम करा, प्रभुत्व मिळवा असे आवाहन त्यांनी विध्यार्थ्यांना केले. प्रारंभी सजवलेल्या वाहनात माता भुवनेश्वरी, बसवण्णा, राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा यांच्या मूर्ती ठेवून शोभायात्रा काढण्यात आली. प्रभाकर कोरे व महांतेश कवटगीमठ यांनी श्रीफळ वाढवून, पूजन करून या मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. पारंपरिक वेशभाषा परिधान केलेले युवक-युवती मोठ्या जल्लोषात या सवाद्य मिरवणुकीत सहभागी झाले होते. एक वेगळाच उत्साह आणि चैतन्य या निमित्त आरएलएस महाविद्यालयाच्या आवारात निर्माण झाले होते.
यावेळी हावेरी विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. विजयालक्ष्मी तिर्लापूर, आरएलएस महाविद्यालयाच्या स्थानिक संचालन समितीचे अध्यक्ष लिंगनगौडा देसाई, आशा कोरे, प्राचार्य, प्राध्यापक आणि विध्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments